सेवापूर्तीचा गौरव सोहळा थाटात साजरा…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भालेरावनगर आणि पाटीलगढीच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त गटसचिवांची जिल्हा पतसंस्था येथे “क्लर्क” प्रकाश मन्साराम पाटील यांचा जाहीर सत्कार…!

अमळनेर (दि. २ जुलै २०२५) – भालेरावनगर आणि पाटीलगढी परिसरातील नागरिकांनी सहकार क्षेत्रात ३४ वर्षे अपार कष्ट, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सचोटीने सेवा देणाऱ्या श्री प्रकाश मन्साराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार व निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री प्रभाकर पाटील, माजी मुख्याध्यापक यांनी भूषवले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर, सहकारी, मित्र, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व श्री ए.डी. पाटील सर यांच्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रकाश पाटील यांच्या आयुष्याचा, कर्तृत्वाचा पट आपल्या खास शैलीत उलगडून दाखवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बापूसाहेब विजय पाटील रत्नापिंप्रीकर यांनी आपल्या विशेष शेरोशायरी शैलीत करत संपूर्ण वातावरण रंगतदार बनवले.

अ‍ॅड. दिनेश पाटील यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या प्रकाश पाटील यांच्या संयमी स्वभावाचा, प्रामाणिकतेचा, कष्टाळूपणाचा आणि सेवेतील योगदानाचा उजळा घेतला.
आबासाहेब गोकुळ पाटील, माजी केंद्रप्रमुख, यांनी त्यांच्या कार्याची माहिती देताना नमूद केले की, “सहकार क्षेत्रात इतक्या प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रकाश पाटील हे एक आदर्श आहेत.”


सहकार क्षेत्रातील ३४ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

दि. ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झालेल्या प्रकाश मन्साराम पाटील यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी अनुभव आहे. अत्यल्प पगारावर सुरुवात करत त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा, सातत्य, नियोजनकौशल्य आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत उत्तम सेवा दिली.

त्यांनी ‘विना सहकार नाही उद्धार’ या उक्तीला खरं करत सभासदांची निःस्वार्थ सेवा केली. नात्यांमध्ये सौहार्द, कामात पारदर्शकता, आणि समाजात विश्वासार्हता हे त्यांचे मुख्य गुण होते. त्यांच्या सेवेदरम्यान एकही काळा डाग त्यांच्या नावावर लागला नाही, हीच त्यांच्या कार्यक्षमतेची सर्वोच्च पावती म्हणावी लागेल.


कुटुंब आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर आदर्श व्यक्तिमत्त्व

सेवाभावी वृत्ती केवळ कार्यक्षेत्रातच नव्हे तर कुटुंबातही त्यांनी जपली. त्यांच्या धर्मपत्नींच्या दीर्घ आजारपणात त्यांनी अपार संयमाने सेवा केली. त्यांची भगिनी “आबई” यांचेही विशेष उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या मोलाच्या साथीसाठी कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते. त्यात प्रमुख म्हणून रामचंद्र उपासनी, श्रीराम पाटील, अहिरराव दादा, विलास पाटील, योगेश खैरनार, दयाराम पाटील, डॉ. महेश पाटील, अनिल दुसाने, महेंद्र काटे, पराग पाटील, स्वप्निल पाटील, आशिष निकम, ठाकरे भाऊसाहेब, युवराज पाटील, अशा अनेकांचा समावेश होता.


मनोगतातून व्यक्त झाली कृतज्ञता

आपल्या निरोपाच्या मनोगतात प्रकाश मन्साराम पाटील यांनी आपल्या भावना शब्दांत मांडताना उपस्थित सर्वांचे आभार मानले. “माझ्यावर जो विश्वास टाकला गेला, तो टिकवून ठेवण्याचा मी सदैव प्रयत्न केला. भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व सज्जनांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून जो सन्मान दिला, तो मी आयुष्यभर विसरणार नाही,” असे भावुक उद्गार त्यांनी काढले.


एक प्रेरणादायी दीपस्तंभ

प्रकाश मन्साराम पाटील हे सहकार क्षेत्रातील एक चालतेबोलते ज्ञानपीठ, एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नक्कीच त्यांची उणीव भासणार आहे. कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र मानणाऱ्या या कर्मयोग्याला भावी आयुष्यासाठी कापडणे परिवाराकडून आणि सर्व कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा…!

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें