
अमळनेर |अटकाव न्यूज : अमळनेर परिसरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. पक्षाचे अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, काही जण भारतीय जनता पक्षात देखील सामील होण्याची शक्यता आहे.
पक्षांतरणाच्या हालचालींना गती देताना माजी मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून हा राजकीय बदल घडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील परेश शिंदे आणि इतर कार्यकर्ते 3 मे रोजी मुंबई येथे अजित पवार गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. यानंतर जळगाव येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार असून, त्यात आणखी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची शक्यता आहे.
याशिवाय, राष्ट्रवादीचे अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
पारोळा आणि जळगाव येथील माजी मंत्री गुलाबराव देवकर व डॉक्टर सतीश अण्णा पाटील हे देखील 3 मे रोजी अजित पवार गटात सामील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या राजकीय घडामोडीमुळे अमळनेरमधील बाजार समितीच्या सत्तेतही मोठा बदल होण्याची शक्यता असून, येणाऱ्या निवडणुकीत नवे समीकरण तयार होतील. एकीकडे काहींच्या राजकीय आकांक्षा फुलण्याची शक्यता आहे, तर काहींच्या आशा धूसर होण्याची चिन्हं आहेत.
