
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेते विजय बडगुजर यांनी धुळे जिल्ह्यात मिळविला प्रथम क्रमांक
अमळनेर; महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ बक्षीस वितरण समारंभ दिनांक २८ मार्च २०२५ रोजी धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभास DIET धुळेच्या प्राचार्या आदरणीय डॉ. मंजूषा क्षीरसागर मॅडम, जेष्ठ अधिव्याख्याता आदरणीय डॉ. जे. एस. पाटील, आदरणीय डॉ. रमेश चौधरी, डॉ. शिवाजी ठाकूर, डॉ. मिलिंद पंडित, डॉ. चंद्रकांत पवार, श्रीमती जे. टी. पाटील, श्रीमती एस. टी. पाटील, डॉ. भालचंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पवार यांनी केले, तर संमाननीय डॉ. किरण कुवर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, लोकी येथे कार्यरत असलेले व अंमळनेर येथील रहिवासी श्री. विजय प्रकाश बडगुजर यांनी इयत्ता सहावी ते आठवी गटातील (इंग्रजी विषय) व्हिडिओ निर्मितीमध्ये धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना या सन्मानासह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रु. १०,०००/- चा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. शिक्षकांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी-केंद्रीत शिक्षण प्रणालीला बळकटी देण्यासाठी या प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी DIET धुळेच्या संपूर्ण कार्यकारी समितीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित शिक्षक आणि मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
