
अमळनेर : हुंडा घेणार नाही अशी शपथ घेऊन चळवळीत काम करणाऱ्या दीपक याने, आपल्या घरच्यांनी पत्नीच्या कुटुंबाकडून गुपचूप हुंडा घेतल्याचे समजल्यानंतर, पत्नी करुणाने याबाबत सत्य सांगितले नाही या कारणाने तिला माहेरी पाठविले. मात्र, चार महिन्यांच्या संघर्षानंतर अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने समेट घडवून आणला.
दीपक व करुणा यांचा विवाह नुकताच झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच दीपकला समजले की त्याच्या कुटुंबीयांनी करुणाच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला आहे. परंतु, पत्नीने हे सत्य लपवून ठेवल्यामुळे भविष्यातही ती काही गोष्टी लपवेल, अशी शंका घेऊन दीपकने करुणाला वेगळे केले. या प्रकरणी अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली.
समितीने दीपकच्या तत्त्वनिष्ठ धोरणाचे कौतुक केले, मात्र, त्याला अत्यंत कर्मठ न राहण्याचा सल्ला दिला. करुणाने हे सत्य लपवण्याचे कारण केवळ संसार टिकावा हा हेतू होता, हे स्पष्ट करून दीपकचे प्रबोधन करण्यात आले. अखेर दीपकने आपला दृष्टिकोन बदलत करुणाला पुन्हा स्वीकारले आणि दोघेही आनंदाने संसारात रमले.
या यशस्वी समेटासाठी महिला अन्याय विरोधी समितीचे अध्यक्ष धनंजय सोनार, निशा विसपुते, मंगला विसपुते, बाळकृष्ण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच, समितीच्या या कार्याचे मंगळ मंदिराचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, दिलीप सोनवणे, गौतम मोरे, प्रा. शिला पाटील, मनोहरनाना पाटील, राजकुमार कोराणी आदींनी प्रशंसा केली.
(धनंजय सोनार, अध्यक्ष – महिला अन्याय विरोधी समिती)
