
डॉक्टर गैरहजर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातच थांबले प्राण
अमळनेर, दि. १८ – तालुक्यातील पातोंडा येथे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. मात्र, पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्याने आणि तातडीने उपचार न मिळाल्याने त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा येथील प्रवीण एकनाथ बिरारी (वय 26) या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब समजताच त्याच्या वडील व भावाने तत्काळ त्याला खाली उतरवले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टर तर दूरच, पण इतर वैद्यकीय कर्मचारीही उपस्थित नव्हते.
नातेवाईकांनी डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही मदत दिली नाही. जवळपास एक तास डॉक्टर व नर्सच्या प्रतीक्षेत राहिल्यानंतर, कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची मदत घेतली आणि प्रवीणला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावापासून अवघ्या ५ किमी अंतरावरच त्याने अखेरचा श्वास घेतला.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी असतानाही संध्याकाळी ६ वाजता एकही जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर वेळेवर प्राथमिक उपचार मिळाले असते, तर कदाचित प्रवीणचा जीव वाचला असता.
सरकारने ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, हे या घटनेवरून स्पष्ट होते. यासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
