
अमळनेर (अटकाव न्यूज ) :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे अमळनेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यावेळी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनिल पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनिल भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ‘जय भीम’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. समितीचे कार्यकर्ते तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्यात सहभागी झाले.
समाजातील सर्व घटकांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपावा आणि त्यांच्या तत्वांनुसार समाजप्रबोधनाचे कार्य पुढे न्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.








