
अमळनेर : “शेतकऱ्यांचे कष्टाचे कोट्यवधी रुपये बुडवून पळ काढणारा आणि निवडणुकीच्या तोंडावर मलिदा लाटण्यासाठी पक्षांतरण करणारा नेता तुमच्या शहराचा विकास करणार का?” असा थेट सवाल लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी प्रभाग क्र. १८ मधील प्रचार सभेत उपस्थितांना करताच कार्यक्रमस्थळी गर्दीत खडबडून जाग आली.
शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर, नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता विनोद लांबोळे व गणेश आनंद पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली.
सातपुडा साखर कारखान्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
सभेत बोलताना शिंदे म्हणाल्या की,
शिरीष चौधरी यांनी शहादा येथील सातपुडा साखर कारखाना विकत घेतला, मात्र अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देणे बाकी असताना कारखाना कोट्यवधी रुपयांत विकून त्यांनी “पळ काढला”.
“ज्यांच्यावर शेतकऱ्यांच्या घामाच्या एका थेंबाचीही कदर नाही, तो माणूस शहराच्या विकासाची काळजी घेईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
—
‘मलिदासाठी पक्षप्रवेश’ — शिंदेंची घणाघाती टीका
शिंदे यांनी आरोप केला की चौधरी यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला तो “केंद्रस्थानी येण्यासाठी नव्हे, तर मलिदा लाटण्यासाठी”.
“उपमुख्यमंत्रीलाही जाळ्यात अडकवून हा प्रवेश घडला,” असा गंभीर आरोप करत त्यांनी चौधरींवर सरळ नेम धरला.
—
डॉ. परीक्षित बाविस्करांवरही टीकास्त्र
शिंदे येथेच थांबल्या नाहीत.
त्या म्हणाल्या—
“डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वयाच्या चाळिशीनंतर मायभूमीची आठवण का झाली? आरक्षण जुळताच ते सरळ अमळनेरला आले, आणि निवडणूक संपली की परत जातील, हे लोकांना ठाऊक आहे.”
—
‘जितेंद्र ठाकूर— उपलब्ध, सडेतोड आणि जनहितासाठी तत्पर’
सभेत त्यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा उल्लेख करताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा उल्लेख केला.
“शहराच्या समस्या उघडकीस आणणे, लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे, आणि सामान्य नागरिकांसाठी सातत्याने उपलब्ध असणे — हे ठाकूर यांचे वैशिष्ट्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.
मान्यवरांची उपस्थिती— सभा उत्साहात पार
या सभेला माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
मंचावर अनिता लांबोळे, हाजी नासिर, प्रवीण महाजन, गणेश पवार, भाईदास महाजन, पन्नालाल मावळे, गुलाब बोरसे, झुलाल बापु पाटिल यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








