
हस्तांतरण फी २ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आणण्यास भाग पाडले
‘अजून कमी करणार’ – सत्ताधाऱ्यांचे जाहीर आश्वासन :
अमळनेर: अटकाव न्यूज:
पालिकेच्या पहिल्याच सभेत शहर विकास आघाडीने सत्ताधाऱ्यांची मनमानी उघड्यावर आणत, जनहितविरोधी निर्णयांना अक्षरशः कडाडून विरोध केला. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधाऱ्यांची पुरती गोफ्लधळ उडाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे झटपट आटोपशीर होणारी सभा तब्बल चार तास चालली, ही बाबच सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची साक्ष देणारी ठरली.
सभेतील सर्वाधिक गाजलेला आणि वादळी ठरलेला मुद्दा म्हणजे हस्तांतरण फी. नागरिकांच्या खिशावर थेट घाला घालणारी २ टक्के अवाजवी हस्तांतरण फी पूर्णतः रद्द करावी, अशी ठाम मागणी शहर विकास आघाडीने लावून धरली. तीव्र विरोध, प्रश्नांचा भडिमार आणि सभागृहातील वाढता दबाव पाहता सत्ताधाऱ्यांना अखेर २ टक्क्यांवरून १ टक्का फी मंजूर करावी लागली. एवढ्यावरच न थांबता, जिल्हाधिकाऱ्यांकडे याहीपेक्षा कमी फी करण्यासाठी प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांना द्यावे लागले.
विशेष म्हणजे, पूर्वी मोर्चे काढणारे, निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा करणारेच सत्तेत आल्यानंतर मात्र मूक प्रेक्षक बनले, ही बाब शहर विकास आघाडीने सभागृहात ठळकपणे मांडली.
हस्तांतरण फी वाढ, शहरातील बकाल स्वच्छता व्यवस्था, प्रशासकीय अनागोंदी आणि अधिकाऱ्यांची बेजबाबदारपणा या मुद्द्यांवर स्वीकृत सदस्य डॉ. डिगंबर महाले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी विचारलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांपुढे अनेक विभागप्रमुख आणि जबाबदार अधिकारी निरुत्तर झाले. गोलमोल उत्तरे, संदिग्ध टिपण्या आणि सत्ताधारी नगरसेवकांचा वारंवारचा हस्तक्षेप यामुळे सभागृहातील गोंधळ अधिकच वाढला.
सभागृहातील सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे महिला नगरसेविकांचा अवमान. विद्यमान नगरसेविका तसेच माजी नगराध्यक्ष असतानाही सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह शहर विकास आघाडीतील महिला नगरसेविकांना सभागृहाच्या शेवटच्या बाकांवर बसवण्यात आले. या अशोभनीय प्रकारावर सौ. जयश्रीताई पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनीही याला जोरदार विरोध करत हा प्रकार लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारा असल्याचे ठणकावून सांगितले. अखेर सत्ताधाऱ्यांना यापुढे महिलांना सन्मानपूर्वक जागा दिली जाईल, असे आश्वासन द्यावे लागले.
सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, अडखळणारी भूमिका आणि विषयांवरील अपुरी तयारी यावरून डॉ. डिगंबर महाले यांनी खरपूस समाचार घेतला. ही सभा सर्वार्थाने त्यांनी अभ्यासपूर्ण आक्रमकतेने गाजवलीच, पण सत्ताधाऱ्यांना वाजवलीही.
याच सभेत नगरसेवक पंकज चौधरी यांनी ‘माझा शेर राहून गेला’ असे म्हणत मोबाईलवरून अडखडत शेर वाचण्याचा प्रयत्न केला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता डॉ. महाले यांनी तोंडीपाठ असलेल्या शेरनेच प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली. हा प्रसंग सध्या शहरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.
शहर विकास आघाडीने केवळ विरोधापुरती भूमिका न ठेवता जनहिताच्या मुद्द्यांना ठाम पाठिंबा दिला. शहरात १०० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बालकांच्या दफनासाठी स्वतंत्र जागा, शहीद जवानांच्या कुटुंबियांना करमाफी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संकुलाला त्यांचे नाव देणे या सर्व विषयांना शविआने उत्स्फूर्त समर्थन दिले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.
एकूणच, पालिकेच्या पहिल्याच सभेत शहर विकास आघाडीने सत्ताधाऱ्यांची दर्पोक्ती मोडून काढत, जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणले आणि आगामी काळात पालिकेत खरी लोकशाही कशी चालेल याची स्पष्ट झलक दाखवून दिली.








