Search
Close this search box.

चोरीची मालवाहतूक पिकअप विक्रीसाठी आणणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन चोरट्यांना अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (ता. 18 एप्रिल 2025) – शहरात मालवाहतूक करणारी चोरीची पिकअप विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी कारवाई करत मध्य प्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. ही कारवाई 16 एप्रिल रोजी सायंकाळी गलवाडे रोडवरील माऊली टी हाऊस परिसरात करण्यात आली.

डीबी पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची पिकअप चोरीची असून ती विक्रीसाठी शहरात येणार आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व प्रभारी अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच नाकाबंदी लावण्यात आली. रात्री 8 वाजेच्या सुमारास एक संशयित पिकअप MH 18 G 3221 क्रमांकाची गाडी त्या मार्गावरून येताना आढळली. पोलिसांनी तिला थांबवून तपासणी केली असता, गाडीमध्ये बसलेले दोन इसम उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले.

पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:

  1. फिरोज खान अमित खान (वय 29), रा. आगार रोड, उज्जैन, मध्य प्रदेश
  2. दानिश शेख अब्दुल शकूर शेख (वय 23), रा. साजापूर मोहल्ला, मोगलपुरा, मध्य प्रदेश

त्यांच्याकडे वाहनाचे मूळ कागदपत्र नसल्याने पोलिसांना संशय आला. वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर समोरच्या नंबर प्लेटखाली MP 43 G 2132 असा खरा क्रमांक असलेली दुसरी प्लेट आढळली. यावरून वाहनाचा मूळ मालक रतलाम, मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर पिकअप 12 एप्रिल रोजी रात्री रतलाम बसस्टँडच्या पाठीमागून चोरीस गेल्याची माहिती मालकाने दिली. या संदर्भात स्टेशन रोड पोलीस स्टेशन, रतलाम येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता (गुन्हा क्र. 293/2025, भादंवि कलम 303(2)).

या घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी रतलाम पोलिसांशी संपर्क साधला. 17 एप्रिल रोजी रतलाम पोलिसांचे पथक अमळनेर येथे दाखल झाले. कायदेशीर प्रक्रियेनंतर चोरीची गाडी व अटक आरोपी रतलाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयितांची साजापूर कारागृहात पूर्वी भेट झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे आवाहन:
कोणत्याही चोरीस गेलेल्या वाहन वा व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी अधिकारी श्री. केदार बारबोले यांनी केले आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें