70 कोटी निधीतून साकारणार चार महत्वपूर्ण रस्ते
अमळनेर : शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन शॉर्ट कट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या चार रस्त्यांच्या कामासाठी एकूण ७० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे शहराबाहेरून जाणाऱ्या ८० फुटी रस्त्यावर फुटपाथ ,गटारी ,विद्युत रोषणाई आणि सेल्फी पॉईंट अशा सर्वसमावेशक सुशोभित घटकांचा समावेश राहणार आहे.
या निधीअंतर्गत धुळे रोड ते ओमशांती नगरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २३.९६ कोटी, गलवाडे रोड ते धुळे रोडसाठी २९.५२ कोटी, तुळजाई हॉस्पिटल ते पिपळे रोड ३.१६ कोटी व ईदगाह मैदान ते विप्रो कंपनी रस्त्यासाठी १४.२४ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.
यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले की या नवीन जोड रस्त्यांमुळे नेहमी लागणारे अंतर कमी होऊन नागरिकांना लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी सुटून नवीन कॉलनी परिसराचा विकास होणार आहे. प्रभाग ८ मध्ये ७५ लाखांची अभ्यासिका होणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी नॅनो शास्त्रज्ञ एल ए पाटील , जेष्ठ साहित्यीक कृष्णा पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत पाटील , शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार , भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील , जयश्री पाटील , रिता बाविस्कर ,विवेक पाटील , यज्ञेश्वर पाटील ,शिवाजीराव पाटील, संजय पाटील , प्रताप शिंपी ,प्रा अशोक पवार ,गिरीश पाटील , बी ए पाटील ,राजन पाटील ,दीपक पाटील हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.