अमळनेरचा उत्तरेकडील बोरी काठ हिंस्र प्राण्यांच्या दहशतीत

हिंस्र प्राण्यांनी शेतकऱ्यांची जनावरे मारणे सुरू केले

अमळनेर;  गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यातील उत्तर दिशेच्या बोरी काठ परिसर हिंस्र प्राण्यांच्या दहशतीत आहे. कुठे बिबट्या तर कुठे लांडगे ,कुठे कुत्रे यांच्या हल्ल्यात शेळ्या , गोऱ्हे ,डुकरे ,गायी ठार होत आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासन ,वन विभाग आणि ग्रामस्थांनी संयुक्तिक सावधानता बाळगून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना शेती परवडत नाही , निसर्ग दरवर्षी फटके देतो म्हणून शेतकरी जोड व्यवसाय करतो. गोरगरीब लोक गाय ,शेळ्या पाळून आपला उदरनिर्वाह करतात. काही डुकरे पाळून आपला उदरनिर्वाह करतात.
गेल्या काही दिवसांपासून पिंगळवाडे गावात शिरून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाच ते सहा जनावरांचा फडशा पाडला आहे. तसेच मुडी दरेंगाव परिसरात चार पाच शेळ्या ठार केल्या आहेत. गांधली पिळोदा शिवारात शेळ्या ,पारडू ,गोर्हा , डुकरे यांच्यावरही हल्ला करून काही जखमी तर काही ठार करण्यात आले आहेत. गावकरी कुत्र्यांनी शिकार केल्याचा दावा करतात कदाचित लांडगे किंवा कोल्हे असावेत. त्याच प्रमाणे आज पहाटे लडगाव येथे काही बकऱ्या जखमी तर काही ठार करण्यात आल्या. गावकरीचे म्हणणे आहे की बिबट्या होता वन विभाग म्हणते की लांडगे होते. तसेच बोहरा गावाला देखील बिबट्याने गोर्हा खाल्ल्याचे वृत्त आहे. उत्तर दिशेकडे सातपुडा असल्याने जंगलाकडून हिंस्र प्राणी आले असावेत. उत्तरेकडील बोरी काठ धोक्यात आहे. जोपर्यंत मानवाला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत बिबट्याला पकडले देखील जात नाही असा नियम असला तरी हिंस्र प्राण्यांना पळवण्याची तरतूद निश्चित वनविभागाकडे असली पाहिजे. गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थ सतर्क झाला पाहिजे तसे ग्रामपंचायत, प्रशासन व वनविभागाने देखील गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]