राज्य पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद : मनोज जरांगे पाटील

माझे व पत्रकार संघ दोन्ही कार्य सारखेच

अकोले ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या व समाजातील उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी काम करतो तर मी व माझे सहकारी देखील मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी काम करत आहोत , त्यामुळे आमचे दोघांचेही कार्य सारखेच आहे. राज्य पत्रकार संघाचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रणासाठी भेट दिलेल्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र सचिव डॉ.अनिल रहाणे, रिसोड प्रतिनिधी अशोक चोपडे,अरुण कराड आदींच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यानी निरपेक्ष पणे बातमीदारी करावी, सर्वाना समान न्याय द्यावा अशी भूमिका त्यानी व्यक्त केली. पत्रकार संघ पत्रकारांचा व त्यांच्या प्रश्नांचा विचार करतो तर आपण मराठा समाजाच्या हिताचा विचार करतो असेही ते पुढे म्हणाले.
राज्य सरचिटणीस डॉ आरोटे यांनी यावेळी पत्रकार संघाची दीक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा , विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामांबद्दलचे पुरस्कार,पत्रकार विमा कवच आदि विषयांवर चर्चा केली. पत्रकार संघ व आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमासाठी जरांगे पाटलाना निमंत्रित करण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ डायरी व घड्याळ भेट देत जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *