अमळनेर : तालुक्यातील सात्री गावातील पोलीस पाटील विनोद बोरसे यांच्यावर गुन्हेगारी कृत्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सात्री ग्रामस्थ प्रशांत रामचंद्र बोरसे यांनी याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, मौजे सुंदरपट्टी येथील गोपाल सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात आरोपींनी पोलीसांना दिलेल्या जबाबीत विनोद बोरसे यांचे नाव घेतले आहे. आरोपींनी बोरसे यांच्या सांगणेवरून हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे.
या प्रकरणी धरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, बोरसे हे गुन्ह्यात सहभागी असल्याने फरार आहेत. त्यामुळे सात्री गावात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी बोरसे यांच्यावर कारवाई करून त्यांची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. गावात पोलीस पाटील पद महत्त्वाचे असून सणांच्या काळात पोलीस पाटलाची फरारी चिंतेची बाब आहे, पोलीस पाटील फरार असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोरसे यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता फरार होणे ही गंभीर बाब असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रांताधिकारीकडून काय कारवाई?
याबाबत प्रांताधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बोरसे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.