माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक
अंमळनेर: येथील सुज्ञ जनतेने गेली पाच वर्षे निवडून दिलेले भूमिपुत्र आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री अनिल दादा पाटील यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत असून माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी विद्यमान आमदार होण्याचे स्वप्नही पाहू नये असा टोला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदतच 26 नोव्हेंबर 2026 पर्यंत असल्याने सर्व विद्यमान आमदार आणि मंत्री तोपर्यंत पदावर कायम आहेत.आणि 23 नोव्हेंबर नंतर देखील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येऊन अमळनेर येथे फक्त अनिल दादाच पुन्हा सन्मानाने आमदार होतील असा दावा देखील खाटीक यांनी केला आहे.यासंदर्भात अधिक बोलताना त्यांनी म्हटले आहे की अमळनेर मतदारसंघाची जनता यावेळी जाती धर्माच्या नावावर मतदान करणार नसुन विकास हा एकमेव मुद्दा मतदानासाठी प्रत्येकाच्या मनामनात असणार आहे.याशिवाय शहरात गुंडगीरी संपुष्टात आणण्यात अनिल दादा यांना यश आल्याने नागरिक व्यापारी बांधव सुरक्षित झाले असून विशेष करून महिला भगिनींच्या मनातही सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे अनिल दादाच योग्य उमेदवार असल्याचे प्रत्येकाचे मत झाले आहे.गेल्या दोन निवडणूकित ज्यांनी जातीचे कार्ड वापरून या पवित्र भूमित विष पेरण्याचे काम केले त्यांना एकदा घरी पाठवल्यानंतर जातीपातीचे राजकारण या तालुक्यात संपुष्टात आले असून अनिल दादांनी गेल्या पाच सर्वच जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने सारे जण आता त्यांना मनापासून जुळले आहेत. यामुळे सर्वांच्या ताकदीने अनिल दादा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आमदार होतील असा विश्वास खाटीक यांनी व्यक्त केला आहे.