अमळनेर : आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमळनेर तालुक्याची शांतता कमिटीची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत नगर परिषदेच्या रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला, दोघांमधून एक व्यक्ती रस्त्यांबाबत तक्रार करीत होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव परीक्षेच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर होत्या.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, येत्या काही दिवसांत गणेशोत्सव व विसर्जनाच्या वेळी मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद हा सण देखील आहे. म्हणून यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी मंगळवारी अमळनेर पोलिस प्रशासनाने शांतता कमिटीची बैठक घेतली. यावेळी पोलिस व इतर प्रशासनिक अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. यात गणेश मंडळांनी त्यांनी येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. महावितरण व पोलीस प्रशासन यांच्यावरही काहीशी नाराजी व्यक्त करत नगर परिषदेच्या रस्त्यांबाबत मात्र चांगलीच नाराजी अनेक उपस्थितांनी व्यक्त केली. यावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तात्काळ रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. तर महावितरण अधिकारी यांनीही गणेशोत्सव काळात महावितरण कडून काहीही अडचण येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. पोलीस विभागाने डीजेला परवानगी द्यावी व विसर्जनाच्या रात्री वेळ वाढवून द्यावा अशीही मागणी काही मंडळांनी केली होती. मात्र डीजेची परवानगी नाही तर दिलेल्या वेळेतच मिरवणूका संपवा असेही अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी म्हटले. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, प्रांताधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, मारवडचे सहायक पोलिस निरीक्षक जीभाऊ पाटील तर शांतता कमिटीचे सर्व सदस्य, गणेश मंडळ व मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.