खानदेश ची एक तोफ अजून थंडावली

एक निर्भीड व अभ्यासू पत्रकारकै. राजेंद्र सुतार

कै. राजेंद्र सुतार जेष्ठ पत्रकार

दुआ में याद रखना….,मृत्यू हा अटळ आहे…,एक निर्भीड व अभ्यासू पत्रकार…,खानदेश ची एक तोफ अजून थंडावली…, आनंदाचा झरा आटला…. ……लेख जरूर वाचा……

दुआ में याद रखना….

अमळनेर: अटकाव न्युज

आमचे परममित्र कै. राजेंद्र सुतार यांच्यावर
मी व माझी मुलगी डॉक्टर तस्नीम कादरी आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त २७ नोव्हेंबर २०२३ ला एक लेख फेसबुक वर इंग्रजीतून प्रसिद्ध केलेला होता आणि मी माझे दुर्दैव समजतो की आज मला त्यांच्या एका आठवड्यात निर्वाणी चा लेख लिहिताना माझे मन हे भारावून गेले आहे, भावना ऊचंबळून आलेल्या आहेत. काय आणि किती लिहावे हे समजत नाही. अनेक प्रसंग आहेत पण थोडक्यात लिहिण्याच्या प्रयत्न करीत आहे.

मृत्यू हा अटळ आहे

मृत्यूच्या काळ व वेळ आणि स्थळ ठरलेला आहेआणि ते आपल्याला स्वीकारावेच लागेल. असं म्हणतात माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्व आहे .नाना म्हणून सर्वांना परिचित असलेला जिंदादिल मित्र आपल्या मर्जीप्रमाणे जगला आणि परमेश्वराच्या
मर्जीने गेला.
बहुत गौर से सुन रहा था जमाना दास्तां आपकी!*
आप खुद ही सो गए दास्तां कहते-कहते!!

एक निर्भीड व अभ्यासू पत्रकार

म्हणून त्यांची ख्याती होती. साप्ताहिक लोकमानसचे सहसंपादक, लोकमत, गावकरी ,महाराष्ट्र टाइम्स आदी वर्तमानपत्रात यामध्ये काही काळ वृत्तांकन सुद्धा त्यांनी केलेले होते. एलआयसी एजंट म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ कार्य केले होते. काँग्रेसचा हाडाचा व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून चीर परिचित होता. तालुका व जिल्हा स्तरावर त्यांनी विविध मानाचे पद भूषविले होते.जनरल सेक्रेटरी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी, व्हॉइस प्रेसिडेंट जिल्हा काँग्रेस सेवा दल,एन एस यु आय चे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य केलेले आहेत. तालुका व जिल्हास्तरावर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविलेली होती.सध्या ते मुंबई काँग्रेसचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरला एका उंचीवर नेण्याचे कार्य त्यांनी केले व गेल्या दहा वर्षापासून सक्रिय सदस्य होते. महाराष्ट्रात प्रथमच संपूर्ण महिलांची कार्यकारणी अमळनेरला व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी रोटरी सदस्य , अमळनेर शहरात जायट्स ग्रुप व अनेक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात पुढाकार घेतलेला होता. माझे हरवलेले अमळनेर हा आपल्या खास शैलीने लिहिलेला लेख फेसबुकवर प्रसिद्ध केले आणि अमळनेरचा मांडलेला इतिहास हे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता .खाशी मंडळात शिक्षणाचा खालावलेल्या दर्जाबद्दल व भ्रष्टाचाराबद्दल त्याला फार काळजी वाटायची त्यामुळे खानदेश शिक्षण मंडळ व्हाट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे.गेल्या वर्षी त्याने खाशी मंडळाच्या काही संचालकांवर सडकून टीका केलेली होती. आयुष्यात कधीही कोणाला ब्लॅकमेल केलेले नाही अथवा पीत पत्रकारिता केली नाही .कठीण प्रसंगी सुद्धा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता व आपले इमान कधीही विकले नाही आणि आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही.लोकशाहीचा चौथा खांब पत्रकार म्हणून आपल्या लेखणीने लोकांना प्रबोधन करण्याचे व सजग करण्याचे कार्य त्याने आपल्या परीने पूर्ण केले. हजर जबाबी व आपल्या मतांवर ठाम असल्यामुळे संवादात किंवा वाद विवादात समोरची व्यक्ती सहसा पडत नसे.आता मी पुस्तके वाचणे बंद केलेले आहेत तर माणसांच्या चेहऱ्याचे मी अभ्यास करून त्याची पारख मी करून घेत असतो असं तो नेहमी मला म्हणायचं. महात्मा गांधीच्या सर्वधर्मसमभाव ह्या त्यांच्या विचारसरणीला अनुसरून तो नेहमी म्हणायचा व येथे लिहिणे मला आवडेल

ना तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा
इंसान की औलाद है तू इंसान बनेगा

खानदेश ची एक तोफ अजून थंडावली …..

गेल्या तीन ते चार वर्षापासून सोशल मीडिया द्वारे व्हाट्सअप व फेसबुक वर महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय व चित्रपट सृष्टीत आणि संगीत आदी क्षेत्रात ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम करून आपल्या कार्याच्या ठसा उमटविला आहे अशा व्यक्तींवर व कलाकार आदींवर सुद्धा आपल्या खुमासदार शैलीने लेख प्रसिद्ध केले. अमळनेर तालुक्यातील जवळपास सर्व लहान मोठे कुटुंबातील लोकांशी जनसंपर्क होताच शिवाय त्याला त्यांच्या संपूर्ण परिवाराचा इतिहास भूगोल ही माहीत होता. त्यामुळे काही राजकीय व्यक्ती त्याच्या पासून सांभाळून राहायची. आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमात जोरदार भाषणे द्यायचा. मी एकदा विचारलं नाना तुम्ही असेच जोरदार भाषण करतात त्याचे रहस्य काय ?? तर तो म्हणाला मी एक लाख लोकांसमोर ही जोरात भाषण करू शकतो. समोरचे प्रेक्षकगण हे मूर्ख समजायचे आणि भाषण ठोकून मोकळे व्हायचे अर्थात तेवढा अभ्यासही त्याच्या होता. जनता सरकार पडल्यावर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीनी आपल्या पराभवानंतर जेव्हा आपल्या प्रचाराची सुरुवात सर्वप्रथम अंमळनेर शहरातून केली तेव्हा नानांनी त्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिशय उत्कृष्ट रीतीने केले होते . स्वर्गीय इंदिरा गांधींनी पाठीवर शाबासकी ची दिलेली थाप त्याने आपली शिदोरी म्हणून आयुष्यभर जपून ठेवलेली होती . टेबल टेनिस त्याच्या आवडीचा खेळ होता तर क्रिकेट आवडीचा विषय व क्रिकेटचे अनेक रिकॉर्ड्स त्याला ज्ञात होतं.

लिहावयाचे कारण हेच

———- की गेल्या आठवड्यात काशी येथे देवदर्शनाला गेले असताना गंगा तटावर उभा असताना त्याने मला मोबाईलवर संपर्क साधला. मी त्याला म्हणालो
आप बहुत सुंदर और *पवित्र जगह पर खड़े हो! हम सबको दुआ मैं याद रखना! **

कर्मकांडावर जास्त विश्वास न ठेवणारा हा आमचा मित्र जोरात हसला व मला म्हणाला मैं हमेशा ही आप सबको दुआ में याद करता हूं! आम्ही उद्या नेपाळला निघत आहोत पाच दिवस तिथे नेटवर्कच्या प्रॉब्लेम असल्यामुळे आपला
संपर्क होणार नाही !!!हे माझे त्याच्यासोबतचे शेवटचे संभाषण.तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी सुद्धा संपर्क करण्याचे प्रयत्न केला नाही. नेपाळहुन परतीचे मार्गावर यमदूताने त्याला गाठले. मृत्यू हा अनोळखी ठिकाणी व्हावा यात फार मोठा गहन अर्थ सामावलेला आहे.रिटर्न तिकीट कन्फर्म आहे आणि आयुष्य आनंदाने जगा असा मोलाचा सल्ला देणारा, या हरफनमौला मित्राला इतक्या लवकर कन्फर्म तिकीट मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं.परंतु नेपाळहून पुन्हा काशी येथील मनकर्णिका घाटावर अंत्यविधी व अस्थि विसर्जन गंगेत करण्यात आले. हे भाग्य फक्त पुण्यआत्मालाच मिळू शकते आणि इथून स्वर्गाची दारे उघडली जातात असे म्हणतात.

प्रचंड जनसंपर्क

सोशल मीडियाच्या वापर करून फेसबुक किंवाअनेक व्हाट्सअप ग्रुप तयार करणे ,फेसबुक वर मान्यवरांच्या परिचय करून देणे अमळनेरला आल्यावर आमचे मित्रांची चंगळ व्हायची, धाब्यावर किंवा हॉटेलवर गप्पागोष्टी जोक्स करत सहभोजन करणे , लोकांशी संपर्क साधून त्यांची आपुलकीने विचारपूस करणे. मित्रांचे आणि जनसंपर्कातील लोकांचे वाढदिवसाला , लग्नाच्या एनिवर्सरीला शुभेच्छा देणे व व प्रसंगी बर्थडे केक कापणे, त्यांची क्लिप बनवणे गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करणे, लग्नकार्य व प्रसंगी द्वार दर्शनाला मला सोबत घेऊन जाणे. रोज सकाळी मोबाईलवर दिवसाच्या शुभेच्छा सोबत एक सुंदर गाणे टाकणे हे त्याचे नित्याचेच काम होते .आमच्या दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणे. ठाणे येथे गेल्यावर मित्र- मैत्रिणींच्या मोठा गोतावळा सुद्धा त्याने जमविला होता. मित्र जोडणे व टिकवणे हा त्यांच्या हातखंडा विषय होता. सकाळी रोज दोन तास टेबल टेनिस खेळणे व संध्याकाळी एक दीड तास वॉकिंग करणे हे नित्याचेच होत

*हजारों ख्वाहिशें है ऐसी
की हर ख्वाहिश पर दम निकले….*

२५ मे २०२४ ला कै. माधवराव रामजी सुतार यांचे जन्म शताब्दी वर्षाची मोठ्या प्रमाणावर सांगता समारोप आयोजित करावयाच्या होता . अनेक योजना त्याच्या मनात होत्या. अनेक लोकांकडून त्यांनी लेख मागून घेतले होते आणि स्मरणिका सुद्धा प्रकाशित करण्याच्या मानस होता. आमचे मित्र कै. राजेंद्र सुतार यांनी लिहिलेल्या अनेक प्रकारचे साहित्याचे संकलन करून ते प्रसिद्ध करण्याच्या त्यांच्या मानस होता. आमचे मित्र श्री योगेश पाने यांनी सुद्धा बहुतेक प्रकाशनाचे कार्य पूर्णत्वाच्या मार्गावर नेले होते. परंतु दुर्दैवाने ५ डिसेंबर २०२३ नेपाळ सरहद्दीवर परतीच्या मार्गावर यमदूताने त्याला गाठले आणि अनेक योजना कल्पना मनातल्या मनात कोमेजल्या.

आनंदाचा झरा आटला….

आमचे परममित्र नानासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आमची मैत्री ५५ वर्षे अबाधित रहावी या करता मी प्रार्थना केली होती. आमची मैत्री अबाधित राहिली परंतु मित्र गेला….. आनंदाच्या झराला सदा करताआम्ही मुकलो ! माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्यास माझ्यासाठी कोणाशीही वैर घेण्यास तयार परंतु माझ्या केसाला धक्का लागू देणार नाही असे शपथ घेणारा मित्र आज हयात नाही याची खंत पोकळी मला आयुष्यभर राहील! आयुष्यभर मला दोषा सहित स्वीकारणारा एक मात्र मित्र! परंतु जगाला त्याने फक्त माझे चांगले गुणच दाखविले माझेच कौतुक करत राहिला. प. पूज्य साने गुरुजींची ऊक्ती प्रमाणे जगाला प्रेम अर्पावे व कबीरजींच्या दोहे प्रमाणे जगला व प्राण सुद्धा त्यागले….

कबीरा जब हम पैदा हुए जग हंसै हम रोए !
ऐसी करनी कर चलो हम हंसै और जग रोए !!

कै.नानासाहेब राजेंद्र माधवरावजी सुतार यांनाआम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर व पुणे प्रांत, समस्त दाऊदी बोहरा समाज अमळनेर,सर्व मित्र परिवार व सर्व अमळनेरकर आम्ही आपल्याला जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पित करीत आहोत. परमेश्वर सुतार सैंदाणे परिवारावर कोसळलेल्या दुःखाचे डोंगर पार करण्यासाठी धैर्य साहस देवो ! मृतात्म्यास शांती मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना! मकसूद बोहरी अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]