बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू

धुळे तालुक्यातील बोरकंड येथील घटना

धुळे:(प्रतिनिधी): तालुक्यातील बोरी नदी परिसरात बोरकंड, रतनपरा, होरपाडे, नंदाळे बु. शिवारात नरभक्षक बिबट्याने दहशत माजवली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. वन विभाग दुर्लक्ष करीत आहे. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई भदाणे यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.

याबाबत जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई भदाणे यांच्यासह या भागातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली. प्रशासनाने बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनात म्हटले आहे की, आमच्या शिवारात 24 ऑक्टोबर रोजी अत्यंत दुद्रैवी घटना घडली. बोरकुंड गावातील स्वामी दीपक रोकडे (वय ५ वर्ष) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तरी परिसरातील ही लगोपाठ दुसरी घटना आहे. 22 ऑक्टोबरला नंदाळे येथील एका ७ वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला होता.

या घटना घडत असताना वनविभागाचे साफ दुर्लक्ष आहे. मंगळवारची घटना दुपारी १ वाजता घडलेली असताना देखील वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने साधी दखलही घेतली नाही. एवढी वाईट घटना घडलेली असतानाही वनविभागाचे कुठलेही अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी येत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी शिरूड चौफुली येथे मुलाच्या मृतदेहासह आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. वन विभागाच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र आणि संतप्त भावना आहेत.

ग्रामस्थांच्या मागण्या अशा : या घटनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. ग्रामीण भागात सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांचे आणि गुरांचे रक्षण व्हावे तसेच यापुढे कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी रात्रपाळीची शेतीची वीज न देता दिवसा देण्यात यावी. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा.

मागण्यांवर त्वरीत कार्यवाही केली नाही तर ग्रामस्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यातून होणाऱ्या हानीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

यावेळी बापू खलाने, प्रभाकर पाटील, देविदास माळी, भाऊसाहेब देसले, भैय्यासाहेब पाटील, प्रकाश भदाणे, बोरकुंड सरपंच सुनीता भदाणे, हेमंत भदाणे, जितू जैन, दिपक भदाणे, सुनील चौधरी, दिनेश पाटील, नंदू पाखले, रावसाहेब माळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]