
अमळनेर : तालुक्यातील कोळपिंप्री येथे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेली अत्याधुनिक डिजिटल अंगणवाडी जिल्ह्यातील एक आदर्श प्रकल्प ठरत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या आधुनिक अंगणवाडीची जिल्हा परिषद व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अंगणवाडीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, दर्जेदार बांधकाम आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणाबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कनिष्ठ अभियंता संदीप सोनावणे, शाखा अभियंता वैशाली जडे, गटविकास अधिकारी कदम, जिल्हा परिषद मुख्याध्यापक चौधरी, प्राथमिक शिक्षक सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील काटे, विस्ताराधिकारी चिंचोरे रावसाहेब, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, कोळपिंप्रीचे सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी अंगणवाडीतील प्रशस्त वर्गखोल्या, आकर्षक शैक्षणिक भित्तीचित्रे, डिजिटल शिक्षणासाठी उपलब्ध साधने, बालमैत्रीपूर्ण वातावरण, सुरक्षित परिसर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वतंत्र स्वच्छतागृहे, खेळणी, अध्ययन साहित्य तसेच पोषण व आरोग्यविषयक सुविधांची सविस्तर पाहणी केली. ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या आधुनिक अंगणवाड्या महत्त्वपूर्ण ठरतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामीण भागात आधुनिक व डिजिटल सुविधांनी सुसज्ज अंगणवाडी उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हा प्रकल्प जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढ नोंदणी तसेच गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बालपणीच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, कोळपिंप्री येथील ही डिजिटल अंगणवाडी त्या दृष्टीने ग्रामीण भागासाठी एक आदर्श ठरत आहे.
गावकऱ्यांनीही या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत, आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.








