
अमळनेर : अटकाव न्यूज {हितेंद्र बडगुजर}
अमळनेर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची लवकरच सुरुवात होत आहे. यावर्षी प्रथमच नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती नोंदवण्याची ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सुविधा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत खुली राहणार असून, अमळनेरमधील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
‘आमची जनगणना, आमचा विकास’ या संकल्पनेतून घरसूची व गृहगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा तसेच माहिती अधिक अचूकपणे संकलित व्हावी, या उद्देशाने ही स्व-गणना सुविधा सुरू करण्यात आली आहे.
स्व-गणनेची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने OTP द्वारे लॉग-इन करावे. त्यानंतर राज्य, जिल्हा आणि अमळनेर शहर निवडून डिजिटल नकाशावर स्वतःच्या घराचे स्थान निश्चित करावे. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरल्यानंतर ‘SE ID’ तयार होईल. हा SE ID सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. १६ मे ते १४ जून दरम्यान जेव्हा अधिकृत प्रगणक घरभेट देतील, तेव्हा त्यांना फक्त हा SE ID दाखवायचा आहे, त्यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणाची प्रक्रिया अधिक जलद होईल.
जे नागरिक ऑनलाइन स्व-गणना करू शकत नाहीत, त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करतील. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल व कायद्यांतर्गत सुरक्षित असेल.
शहराच्या पुढील दशकातील विकास आराखडा, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि निधीचे नियोजन हे जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे अमळनेरमधील नागरिकांनी ‘मी प्रगती आहे, मी विकास आहे’ या संदेशाला प्रतिसाद देत १ मेपासून सुरू होणाऱ्या स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.








