
अमळनेर | अटकाव न्यूज
अमळनेर शहरातील जुना बस स्टँड भागातील फायनल प्लॉट क्रमांक १२३ येथे नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असले, तरी या कामात साइटपट्ट्या (फुटपाथ/साईड पॅव्हर ब्लॉक्स) न बसवण्यात आल्याने तेथील दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
या परिसरात व्यापारी संकुल, किरकोळ दुकाने आणि सततची ग्राहकवर्दळ असल्याने सुरक्षित व व्यवस्थित पादचारी मार्गाची गरज अत्यंत महत्वाची आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथ नसल्याने पादचारी मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.
दुकानदारांच्या मते, पावसाळ्यात रस्त्याकडेला चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम व्यापारावर होत असून, ग्राहकांची ये-जा अडथळ्यांची बनत आहे. तसेच साइटपट्ट्या नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहनं उभी करतात, परिणामी गर्दी, वाहतूक कोंडी आणि किरकोळ वादांची परिस्थिती उद्भवते.
कामाचे नियोजन करताना साइटपट्ट्या अंदाजपत्रकात न समाविष्ट केल्याबाबत नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “केवळ रस्ता तयार करून विकास पूर्ण होत नाही, सुरक्षितता आणि सुविधा ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत,” असे मत स्थानिकांनी नोंदवले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने तातडीने दखल घेऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करून साइटपट्ट्यांचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.








