सोनगीर टोल नाक्यावर टोलमाफीसाठी ग्रामस्थांचा इशारा; लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोनगीर ( प्रतिनिधी ) – सोनगीर टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरातील गावांना टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी स्थानिक वाहनधारक, ग्रामपंचायती आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धुळे शहर अगदी जवळ असल्यामुळे कामानिमित्त गावकऱ्यांना वारंवार धुळे येथे ये-जा करावी लागते. दरवेळी टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ग्रामस्थांनी आता लढाईचे हत्यार उचलले आहे.

मांडळ, कंचनपुर, वालखेडा, डोंगरगाव, मुडी आणि वाघाडी ही सहा गावे टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या आत येतात. या सर्व गावांच्या ग्रामपंचायतींनी याबाबत लेखी ठराव करून टोलमाफीची मागणी अधिकृतपणे संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.

दररोज या परिसरातून सुमारे १०० ते १२५ चारचाकी वाहनांची सोनगीर टोलनाक्यावरून ये-जा होते. नियमित टोल भरण्यामुळे वाहनधारकांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी “टोल माफी तातडीने लागू करा” अशी जोरदार मागणी केली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “धुळे शहरात सरकारी कामे, वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि रोजगारासाठी आम्हाला आठवड्यात अनेकदा जावे लागते. टोलमाफी ही आमची गरज आहे, सुविधा नव्हे.”

या मागणीबाबत टोलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. अन्यथा, लवकरच मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें