शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ने सन्मानित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर :अटकाव न्यूज  विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जाधव) यांना अत्यंत मानाचा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
साऊ ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आणि श्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शैला बैसाणे यांना ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय सैनिक व कारगिल युद्धातील सहभागी तसेच सर्जिकल स्ट्राईकशी संबंधित मा. सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई, साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. शंकर आदानी, डॉ. मिलिंद स्वामी महाराज भोसुरे, सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते बाळराजे वाळुंजकर, बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित, मराठी अभिनेत्री रुपाली पांडे, नृत्यांगना पूजा माळी, ऑलिम्पिक इंटरनॅशनल सुवर्णपदक विजेते हिमांशू जैन, भारतीय महिला दिव्यांग क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम, राजमाता जिजाऊ भोसले यांच्या माहेरच्या चौदाव्या वंशजांचे प्रतिनिधी मा. संभाजीराजे जाधवराव, युवा उद्योजक संकेतदादा जगताप, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल पावसे, सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई देसले, पर्यावरण रक्षक अर्चनाताई कुर्विनकोप, सुप्रसिद्ध गायिका कल्पना जगताप, गायक प्रमोद कुलकर्णी, डॉ. रोहिणी काळे, पल्लवी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे आयोजक साऊ ज्योती सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सचिन हळदे, उपाध्यक्ष विकास उबाळे तसेच श्लोक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रंगशाही बेलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. मा. महेंद्र गोवर्धन गवई आणि सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या हस्ते श्रीमती शैला बैसाणे यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल
श्रीमती शैला बैसाणे या नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली – रंजाने ता.अमळनेर, जि. जळगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक जाणीव, संस्कार आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्येही त्या सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
“पुरस्कारातून मिळाली नव्या कार्याची प्रेरणा”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना शैला बैसाणे म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा सन्मान नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सहकारी, परिवार आणि हितचिंतक यांच्या विश्वासाचे हे फलित आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी शैक्षणिक व समाजोपयोगी उत्कृष्ट कार्य करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा मला मिळाली आहे.”
तसेच त्यांनी साऊ ज्योती सामाजिक संस्था, श्लोक फाउंडेशन, विशेषतः सचिन हळदे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त केले.
शैला बैसाणे यांना मिळालेल्या ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ आणि ‘आदर्श शिक्षिका’ या दुहेरी सन्मानाबद्दल अमळनेर तालुक्यासह शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें