अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व व्यवस्थापन समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर, अटकाव न्यूज  : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करण्यात आलेली ही समिती ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवणे, रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विविध आरोग्य उपक्रमांना गती देणे तसेच स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांसाठी कार्य करणार आहे.
समितीची रचना
समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्य म्हणून पंचायत राज संस्थांचे दोन प्रशासक, एनजीओ प्रतिनिधी संजय कावडे, महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूनम राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश लक्ष्मण महाले पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, गट विकास अधिकारी अमळनेर, उपअभियंता बांधकाम विभाग, पशुसंवर्धन अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. तर ग्रामीण रुग्णालय अमळगावचे वैद्यकीय अधीक्षक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव
निलेश महाले पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. गाव व परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, युवकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे तसेच विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढविणे यासाठी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि व्यापक लोकसंपर्काचा लाभ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, औषधांचा पुरेसा साठा, माता-बाल संगोपन सेवा, रोगप्रतिबंधक मोहिमा, शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि रुग्णांच्या तक्रारींचे निराकरण यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
विविध मान्यवरांकडून अभिनंदन
निलेश महाले पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, सौ. जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक सचिन बाळू पाटील, शेतकी संघाचे संचालक गणेश भामरे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या
ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, रुग्णालयाच्या समस्या प्रभावीपणे सोडविल्या जाव्यात तसेच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निलेश महाले पाटील यांच्या निवडीमुळे रुग्णालयाच्या सेवा अधिक परिणामकारक होतील आणि रुग्णांच्या प्रश्नांना सक्षम वाचा फोडली जाईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें