अमळनेरचे डॉ. दिपक पाटील यांचा विशेष प्राविण्यासह गौरव; गावरान कोंबडी संवर्धनावर भर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे येथे अंडी उबवणी व कुक्कुटपालन विषयक पाच दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न

अमळनेर  : महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र येथे दिनांक ११ मे ते १५ मे दरम्यान अंडी उबवणी, पिलांचे संगोपन व कुक्कुटपालन व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ७० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेत कुक्कुट पालन विकास सुधारित अंडी उबवणी प्रशिक्षक व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक औटाडे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली शिरसागर यांनी प्रशिक्षणार्थींना अंडी उबवणीपासून ते एक दिवसाच्या पिलांचे संगोपन, लसीकरण, विविध वयोगटांतील पक्ष्यांची काळजी, रोगप्रतिबंधक उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे खानदेशातील सातपुडा भागातील गावरान कोंबडीच्या संवर्धनावर व तिच्यापासून विशेष ब्रीड विकसित करून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायातून जोडधंदा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. कुक्कुटपालन व्यवसाय लघुउद्योजकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान आधुनिक स्क्रीन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सैद्धांतिक माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष अंडी उबवणी केंद्रात एक दिवसाच्या पिलांपासून ते दीड वर्षांच्या पक्ष्यांपर्यंत लसीकरणाची प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली.
या प्रशिक्षणात अमळनेर तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक तथा माजी सभापती पंचायत समिती अमळनेर डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील (रा. मांडळ) यांनी एक दिवसाच्या पिलांचे यशस्वी लसीकरण करून दाखवत विशेष प्राविण्य मिळविले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल समारोप कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे डॉ. जयंत माहोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. दिपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. दिपक औटाडे, डॉ. दिपाली शिरसागर, वरिष्ठ लिपिक पंकज शिंदे उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार भंडांगे व तन्मय पाषाणकर यांनी विशेष सहकार्य केले.
डॉ. दिपक पाटील यांच्या यशाबद्दल निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. आर. सूर्यवंशी (अमळनेर), पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग प्रमुख महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील डॉ. रवींद्रनाथ निमसे, डॉ. एल. आर. धोंडे पाटील, विशेष सर्जन पशु उपायुक्त डॉ. प्रतिभा कोरे (नाशिक) तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका झोपुडकर यांनी अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले.
राज्यस्तरीय या प्रशिक्षणामुळे आधुनिक कुक्कुटपालन व्यवसायाबाबत प्रशिक्षणार्थींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय रोजगाराचे प्रभावी साधन ठरू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें