
अमळनेर | अटकाव न्यूज:-
अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून १०० टक्के थकबाकीमुक्त झाली आहे. सरपंच पाटील यांनी स्वखर्चातून संपूर्ण गावाची घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याने ग्रामपंचायतीवरील आर्थिक ओझे दूर झाले आहे.
सरपंच राजश्री पाटील यांनी गावाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विकासाभिमुख निर्णय घेत ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प केला. याच अनुषंगाने त्यांनी सुमारे ९ लाख रुपये घरपट्टी व पाणीपट्टी स्वतःच्या खर्चातून भरली. या कररकमेचा वापर करून ग्रामपंचायतीकडे थकीत असलेले ७ लाख ८० हजार रुपयांचे वीज बिल अदा करण्यात आले.
ग्रामपंचायतीतर्फे वीज बिलाचा धनादेश नुकताच महावितरण विभागाच्या अमळगाव कक्षाकडे सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी आमदार पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करत सरपंच राजश्री पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली.
याप्रसंगी महावितरण अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील, ग्रामसेवक पवनकुमार वाघ तसेच वायरमन प्रमोद सैंदाने उपस्थित होते.
दरम्यान, सरपंच राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यामध्ये गाव दरवाजा, नवीन स्मशानभूमी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आधुनिक व डिजिटल अंगणवाडी, शनिदेव मंदिर बांधकाम तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार यांचा समावेश आहे.
या सर्व विकासकामांमुळे हिंगोणे खु.प्र.ज. गावाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू असून ग्रामपंचायत थकबाकीमुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.








