वेगाने जाणाऱ्या कारवर गस्तीला असणाऱ्या पोलिसांना संशय आल्यानें , आरोपी अडकले!
अमळनेर : बनावट नंबरच्या कारमधून दरोड्याच्या उद्देशाने जाणार्या मालेगावच्या चार दरोडेखोरांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून कारसह चाकू, टॉमी जप्त करण्यात आले. अमळनेर शहरातील अमळनेर ते चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोर रस्त्यावर बुधवार, ११ रोजी रात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चोपडा रस्त्याने जात होते व् जळगाव सांगत होते संशय आल्याने आरोपी अडकले
अमळनेर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बापू साळुंखे व चंद्रकांत पाटील रात्री गस्तीवर असताना अमळनेर ते चोपडा रस्त्यावर इंडिगो (एम.एच.१९ ए.व्ही. ५३६२) या चारचाकीला दुचाकीची बनावट नंबरप्लेट लावून चालकासह एकूण चार व्यक्ती जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कार अडवली. संशयीताने साहिल शेख सुलेमान (वय २२, रा. मालेगाव, विजयनगर, कुसुंबा रोड) अशी ओळख सांगितली तर त्याच्यासोबत मालेगाव येथील खालीद शहा मेहमूद शहा (२१, रा.रमजानपुरा), इसरार खान जमशेर खान (२३, रा.निहालनगर) व फिरोज शेख मुसा (२४, रा. साहिल नगर) हे गाडीत होते. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण जळगाव जात असल्याचे सांगितले.
चारचाकी ला नंबरप्लेट निघाली दुचाकीची
संशयीत चोपडा रस्त्याने जात असल्याने हे जळगाव का सांगताय ?, यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे बापू साळुंखे यांनी कारची पाहणी केली असता कारच्या पुढील बाजूस नंबर प्लेट नव्हती परंतु मागील बाजूस एम.एच.१९ ए.व्ही. ५३६२ या क्रमांकाची नंबर प्लेट होती. मोबाईलवरील वाहन ऍप्सवर हा क्रमांक टाकून खात्री केली असता तो नंबर दुचाकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
कारमध्ये सापडले टॉमी, धारदार चाकू आणि दोरखंड!
कारची तपासणी केली असता डिकीत चाकाच्या खाली एमएच१५/ बीएक्स ०४७५ हा नंबर असलेल्या चार नंबरप्लेट मिळून आल्या तसेच हूक असलेली लोखंडाची टॉमी व दुसरी सरळ किंचित वाकलेली लोखंडी टॉमी अशा सुमारे २ फूट लांबीच्या टॉम्या मिळून आल्या. कारच्या मागील सीटच्या खाली करड्या रंगाच्या हातरुमालात गुंडाळलेला एक धारदार चाकू, एक सुती पांढर्या रंगाचा दोरखंड व वेगवेगळ्या आकाराच्या मोटारसायकल व कारच्या चाव्यांचे दोन जुडगे असे मिळून आले. हे साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. व कारही चोरीची असल्याचा संशय आहे. म्हणून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.