जळगाव जिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना भाजपकडून पुन्हा संधी

अमळनेर:भाजपच्या पहिल्याच यादीत जळगाव जिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली. विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन यांना सलग सातव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आमदार सुरेश भोळे , आमदार संजय सावकारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेत उमेदवारी ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अमोल जावळे यांना रावेर मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन, जळगाव शहर मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे, भुसावळ मतदारसंघातून संजय सावकारे तसेच चाळीसगाव येथून आमदार मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांचे नाव जाहीर केली आहेत. यात जामनेरमधून गिरीश महाजन, रावेरमधून अमोल जावळे भुसावळ संजय सावकारे चाळीसगावमधून मंगेश चव्हाण तर जळगाव शहरातून सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्या आहेत.

जळगावात सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “तिसऱ्यांदा भाजप पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो. देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील या सर्वांचे मी आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया सुरेश भोळे यांनी बोलताना दिली आहे. “गेल्या दहा वर्षात अनेक कामे झालेली आहेत. मात्र काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. या कामांचा जोरावर जनता पुन्हा मला आशीर्वाद देईल आणि माझी हॅट्रिक होईल”, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे.

चाळीसगांवात मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा संधी

चाळीसगाव मतदारसंघातून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “उतणार नाही, मातणार नाही, घेतलेल्या वसा टाकणार नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले आहेत. माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतच्या कर्मचारी म्हणून काम केलं. त्यांच्या मुलाला पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली. पहिल्या यादीत माझं नाव असल्याने मला आनंद झाला. तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आभार व्यक्त करतो”, असं मंगेश चव्हाण म्हणाले आहेत.

“पार्टीने 2019 ला मला संधी दिली त्या संधीचं सोनं करत मी तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केलं. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाचे मी आभार मानतो. या संधीचं पुन्हा सोनं करून तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध राहीन. मायबाप जनतेचे निवडणुकीचे आभार व्यक्त करतो”, अशी देखील प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *