उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार..

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार
राज्यात गोंदिया आणि नागपुरात कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अंमळनेर: 8जानेवरी 2023 उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यातही जाणवू लागला आहे. गोंदिया आणि नागपुरात कडाक्याची थंडी पडली आहे. गोंदियात पारा 7 अंशावर गेला आहे. यंदाच्या मोसमातलं ते सर्वत कमी तापमान ठरले आहे. राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत तापमानात घट होणार आहे. मुंबईचा पाराही 15 अंशाच्या खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईचे तापमान खाली जाणार
पुढील आठवड्यात मुंबईचे तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून थंडी वाढत आहे. असे असताना मुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे दिसत आहे. हवेचे प्रदूषण वाढल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. दिल्ली पेक्षा मुंबईत हवा सर्वाधिक प्रदुषित झाल्याचे दिसून येत आहे. या बदलाचा परिणाम हा तापमान वाढीवर झाला आहे.

तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले आहे. नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव लुटत आहेत. राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचे तापमान काल 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तथापि, पुढील दोन दिवस सरासरी तापमानाचा पारा हा 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्या सोमवारी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचीही शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडीची मोठी लाट
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या काही भागांत पश्चिमी चक्रवाताचा परिणाम म्हणून थंडीची तीव्र लाट आली असून, दाट धुक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे. राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र किमान तापमान ढगाळ स्थितीमुळे सरासरीपुढेच असल्याने थंडी आटोक्यातच आहे. विदर्भातील काही भागांत तापमानात मोठी घट झाली असून, ती आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे.

हिमालयीन प्रदेशात सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील काही राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट निर्माण झाली आहे. हरियाणा, पंजाब, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आदी राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आहे. तसेच बिहार, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशापर्यंत थंडीच्या लाटेची स्थिती आहे. एकीकडे थंडीची लाट आली असताना पश्चिमी चक्रवाताच्या परिणामातूनच याच भागांत दाट धुके पसरत आहे. अशा परिस्थितीमुळे थंड वाऱ्यांच्या प्रवाहांना महाराष्ट्राकडे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी विदर्भातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला आहे.

गोंदिया, नागपूरमध्ये थंडीची लाट
विदर्भातील तापमानात सध्या मोठी घट झाली आहे. गोंदिया येथे शनिवारी राज्यातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल 5.6 अंशांनी कमी असल्याने ही थंडीच्या लाटेची स्थिती समजली जाते. नागपूर येथे सरासरीपेक्षा 9 अंश किमान तापमानाची नोंद झाली. अकोला, बुलढाणा वगळता विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीखाली आहे. ही स्थिती दोन दिवस राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *