अमळनेर : अटकाव न्यूज – जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या तालुक्यात येत आहेत. यावेळी तालुक्यातील नागरिकांकडून खासदार स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून विजयी रॅली काढण्यात येणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ २ लाख ५१ हजार ५९४ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांचा पराभव केला. या जागेवर भाजपला एकूण 6 लाख 74 हजार 428 मते मिळाली. तर शिवसेनेला ४ लाख २२ हजार ८३४ मते मिळवून त्यांचा पराभव झाला आहे.
नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांची विजय रॅलीस दुपारी ३ वाजता अमळनेर येथील पैलाड नाका येथून सुरवात होणार आहे. पुढे दगडी दरवाजा-बसस्थानक-महाराणा प्रताप चौक मार्गे धुळे रस्त्यावरील स्व.उदय वाघ यांचे स्मारकाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी सर्व अमळनेर मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महायुती तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.