अमळनेरला संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांच्याकडून स्थळांची पाहणी
अमळनेर: वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत महाराष्ट्रात यापूर्वी ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गाव ओळखले जाते. तर ‘कवितेचे गाव’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे कवी मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव. या गावाला ‘कवितेचे गाव’ म्हणून ओळखले जाते.
त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच अमळनेरला संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर अमळनेरला पुस्तकांचे गाव या संकल्पनेद्वारा या गावाला पुस्तकांचे गाव अशी ओळख निर्माण करून देण्याचा आमचा मानस आहे, असे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने ३ मे रोजी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी अमळनेरला येऊन प्रताप महाविद्यालयातील आनंद भुवन जवळील पूज्य साने गुरुजींचे निवासस्थान, संत सखाराम महाराज वाडी संस्थान, श्री मंगळ ग्रह मंदिर, लोकमान्य टिळक स्मारक समिती (जुनी ब्रिटिश लायब्ररी) व मराठी वाङ्मय मंडळ अशा स्थळांची, दालनांची प्रथमदर्शनी पाहणी केली. संचालक डॉ. श्यामकांत देवरे यावेळी म्हणाले की, ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेच्या निमित्ताने अमळनेरसह खानदेशातील साहित्य परंपरेला गती मिळेल व वाचनसंस्कृती सकारात्मकपणे रुजेल.’ यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था नेहमीच कटिबद्ध राहील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, सीए नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, लोकमान्य टिळक स्मारक समितीचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, विवेकानंद भांडारकर, आत्माराम चौधरी, पूज्य सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, दीपक वाल्हे, मंगळग्रह मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डिगंबर महाले, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष रमेश पवार, डॉ रमेश माने, आदि उपस्थित होते. सर्व संस्था प्रमुखांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पुढील कार्यवाही सुरू होऊन अमळनेर या गावाला आता ‘पुस्तकांचे गाव’ अशी ओळख मिळणार असून महाराष्ट्रातील तिसरे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणूनही अमळनेरला बहुमान मिळणार आहे.