जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी- रामकृष्ण बी.पाटील.

मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे

अमळनेर : राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे.लोकसभा निवडणुक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी केली आहे.राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्र असून त्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे,गरोदर आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देणे,०३ ते ०६ वर्षाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, किशोरी मुलींना आरोग्य व स्वच्छ्ता बाबत मार्गदर्शन करणे,बालकांचे लसीकरण करणे आदी महत्वाची दैंनदिन कामे गावपातळीवर करीत असतात.
असे असताना त्यांना मानधन न मिळाल्यामुळे आपले कुटुंब कसे चालवावे असा यक्ष प्रश्न पडलेला आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन मुळातच अत्यल्प मानधन देते तेही वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
सध्या लग्नसराई असल्यामुळे आणि शिक्षणाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त लागत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अपेक्षित आहे.म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल २०२४ या महिन्याचे रखडलेले मानधन तातडीने अदा करून त्यांची होणारी आर्थिक कुचंबणा आणि उपासमार थांबवावी अन्यथा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका ऐन निवडणुकीच्या काळात तीव्र आंदोलन करतील.असा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]