नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे महिला डॉक्टरांचा महिला दिना निमित्त केला सन्मान…
अमळनेर :अटकाव न्यूज:- दिनांक 8 मार्च 2024 रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (नीमा) अमळनेर तालुका शाखेद्वारे रोटरी हॉल येथे महिला दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात (निमा) संघटनेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांचा सन्मान आयोजित करण्यात आला. यावेळी निमा संघटनेतील सर्व डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कार्य उत्तुंग आहे मात्र आव्हानात्मक अशा आरोग्य क्षेत्रात आपण करत असलेले कार्य अनेकांना संजीवनी ठरते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद डॉक्टर सौ. अंजली चव्हाण यांनी भूषविले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर अतुल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संजीव चव्हाण,डॉक्टर विशाल बडगुजर, डॉक्टर चेतन पाटील, डॉक्टर तुषार परदेशी, व मनीषा बडगुजर यांनी विशेष सहभाग नोंदविला.
खरंतर मी संपादक हितेंद्र.जे. बडगुजर अटकाव न्यूज आपल्या कार्यक्रमाची बातमी वाचून मला पण महिला दिनानिमित्त थोडं लिहावंसं वाटलं…
8 मार्च…
आंतरराष्ट्रीय महिला दिन… का साजरा करतात..? सुरवात कशी झाली..? हे थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी…
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी..!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यां पैकी दोन मागण्या होत्या. चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने…
8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.
हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना आली कुठून..?
ही कल्पना सुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
सर्व प्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता.
1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.
पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती…
‘Celebrating the Past, Planing for the Future’ (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना)
2022 ची थीम…
‘जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ ही 2022 ची थीम होती.
2023 ची थीम…
‘एम्ब्रेस इक्विटी’ अशी आहे. म्हणजेच महिलांना केवळ समान संधी उपलब्ध करुन दिल्यास त्यांचा विकास होईल असं नाही. त्याचप्रमाणे इक्विटी म्हणजेच समानपणे वागणूक देणंही महत्त्वाचं आहे. “लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास सुरु करतात. त्यामुळेच सर्वांना समानतेने वागणूक मिळावी आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे,” असं यंदाच्या थीमबद्दल सांगताना म्हटलं आहे.
2024 ची थीम…
इन्स्पायर इन्क्लूजन (Inspire Inclusion) म्हणजेच एक असं जग, जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळावा, या थीमने साजरा केला जाणार आहे.
8 मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात, हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल. खरंतर क्लारा जेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नव्हती.
1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ‘ब्रेड आणि पीस’ (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच…
आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
आज असे एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते. रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुलं देतात. चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते. तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना…
‘Women’s History Month’ म्हणून साजरा करतात.
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व,
स्री म्हणजे मांगल्य…
माझ्या आयुष्यात…
मी सर्व स्त्रियांचा आदर करतो, त्यात खास करून तीन स्रीयांचा आदर करतो…
जिने मला जन्म दिला —— ती… आई
जिने माझ्यासाठी जन्म घेतला —–ती… पत्नी
जिने माझ्यापासून जन्म घेतला ——ती… मुलगी
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली,
तो राधेचा श्याम झाला…
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला…