
सर्व मूर्तींसाठी विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची बनली मंदिरे
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २, व ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
३ मार्च २०२४ रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या पावन उपस्थितीत पूर्णाहूती होईल. श्री गुरुदत्त व श्री अनघामाता, तर श्री कालभैरव व श्री भैरवीमाता यांच्यासाठी दोन स्वतंत्र मंदिरांचे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही मंदिरांच्या आकाराची मंदिरे विश्वात कोठेही नाहीत.
सदर तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यानिमित्त दिननिहाय होणारे धार्मिक विधी याप्रमाणे
१ मार्च २०२४ : स. ९.०० ते दु. १२.०० – प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, देवता स्थापन. दु. २.०० ते सायं. ५.०० – अग्नी स्थापन, जलाधीवास, ग्रह स्थापन, ग्रहयज्ञ, सायंपूजा, आरती. २ मार्च २०२४ : स. ९.०० ते दु. १२.०० – प्रात: पूजन, जलयात्रा, वास्तुशांती शांतीक पौष्टिक हवन. दु. २.०० ते सायं. ५.०० मुख्य देवता हवन, मंदिर व मूर्ती स्थापन, तत्त्वन्यास, धान्यादीवास, शय्याधीवास, सायंपूजा. ३ मार्च २०२४ : स. ९.०० ते दु. १२.०० – प्रात:पूजन, देव प्रबोधन, प्रासाद प्रवेश, उत्तरांगहवन, बलिदान, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, पूर्णाहुती महाआरती.
सदर प्रसंगी विविध क्षेत्रातील ५५ मान्यवर सपत्नीक विविध पुजांचे मानकरी आहेत. ३ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास पूर्णाहुती होईल. याच दिवशी दुपारी २.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जास्तीत जास्त भाविकांनी विविध मूर्तींचे विशेष दर्शन तथा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंगळग्रह सेवा संस्थेने कळविले आहे.
