अमळनेर येथे मंगळग्रह सेवा संस्था,गोदावरी फाउंडेशन तर्फे मोफत नेत्रबिंदू शस्रक्रिया शिबिर

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन मंगळग्रह मंदिरात करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो गरजूंनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन अमळनेर उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनील नंदवाळकर यांच्या डोळ्यांची तपासणी करुन करण्यात आले.
समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून संस्थेतर्फे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमही राबविले जातात, त्यात दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शेतकरी आत्महत्या थांब्याव्यात म्हणून विविध मार्गदर्शन शिबीर तसेच आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज २७ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी प्रास्तविकात सांगितले.
सदर शिबीर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या सहकार्याने होत असून भविष्यातही कायमस्वरूपी आरोग्यविषयक मोफत चाचण्या, मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची तयारी डॉ. पाटील यांनी दर्शविली आहे. येत्या काही दिवसात मोफत एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टीच्या मोफत शिबिराचे आयोजन केले जाणार असून लवकरच तारखा कळविल्या जातील असेही श्री. महाले यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर गोदावरी मेडिकल फाउंडेशन, जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.जाण्या-येण्याचा व भोजनाचा खर्च गोदावरी फाउंडेशनतर्फे केला जाणार आहे.
गोदावरी फाउंडेशनच्या नेत्र शल्य चिकित्सक डॉ. उर्मी गायकवाड यांनी लाभार्थी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यांना सचिन दिपके, मयुरी जाधव व मयुर म्हस्के या नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, गोदावरी फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी विशाल सेजवळ आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]