श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग पूजनाचेही आयोजन
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवरात्रोत्सव भक्ती अन् चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान श्री मंगळग्रह मंदिरात नऊ दिवस मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगीरूपे भाविकांना पाहावयास मिळणार आहेत. त्यात भूमिमातेला नऊ दिवस विविध रंगांतील वस्त्र परिधान करून मंदिरात आकर्षक सजावट केली जाणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभदिनी अर्थात घटस्थापनेच्या दिवशी यजमानांच्या हस्ते सकाळी विधिवत मंत्रोपचारांद्वारे विशेष पूजा-अर्चा होऊन घट बसविले जातील. याप्रसंगी मंगळेश्वरी भूमिमातेला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करुन विराजमान केले जाईल. तसेच अखंड ज्योतही लावली जाईल. नवमीच्या दिवशी नवचंडी महायाग, तर विजयादशमी म्हणजेच दसºयाच्या दिवशी शस्त्रपूजाही होईल.
भूमिमातेची असणार दहा वेगवेगळी रुपे
पहिल्या दिवशी भूमिमातेला लक्ष्मी-बालाजीचे रुप देऊन पहिली माळ रोवली जाईल. दुसऱ्या दिवशी चंद्रासनावर विराजमान केले जाईल. तिसऱ्या दिवशी सूर्यमंडल व नवग्रह, चौथ्या दिवशी मोरावर विराजमान, पाचव्या दिवशी दशावतार, सहाव्या दिवशी गरुडावर विराजमान, सातव्या दिवशी मोहिनी रुप, आठव्या दिवशी सूर्यरथ, नवव्या दिवशी नर्मदा रुप तर दहाव्या दिवशी सिंहासनावर विराजमान केले जाणार आहे, असे मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे.
नवरात्रोत्सवात महिलांना विशेष महत्त्व
नवरात्र अर्थात दुर्गाेत्सव हा विशेषत: महिलांचा उत्सव. त्यामुळे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शहरातील विविध महिला मंडळांच्या महिलांना विशेष महत्त्व देत मंडळाच्या अध्यक्षांना नवरात्रोत्सवादरम्यान महाआरतीचा विशेष मान देण्यात आला आहे.