
आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित
[ अटकावं न्यूज -हितेंद्र बडगुजर }
अमळनेर : उत्तर महाराष्ट्रातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाने तब्बल १७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रवासाला मोठी गती मिळणार असून, वाहतूक व्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.
या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती. वाढती वाहतूक, रस्त्याची खालावलेली अवस्था आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
हा मार्ग उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज हजारो वाहने, शेतमाल वाहतूक करणारे ट्रक तसेच प्रवासी वाहने या मार्गाचा वापर करतात. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांना वेळेचा व इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. मात्र, आता काँक्रिट रस्ता झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गावरील काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यानंतर आता धरणगाव फाटा ते अमळनेर या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे–अमळनेर–चोपडा हा संपूर्ण मार्ग अधिक सक्षम होणार आहे. फागणे ते अमळनेर रस्त्याचे रुंदीकरणही पूर्ण झाले असल्याने धुळे ते चोपडा हा प्रवास भविष्यात अधिक सुलभ आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. केळी, कापूस, मका, भाजीपाला आणि इतर शेतमालाची वाहतूक कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येणार आहे. तसेच औद्योगिक व व्यावसायिक मालवाहतुकीलाही चालना मिळणार असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
काँक्रिट रस्त्यांचे आयुष्य अधिक असल्याने वारंवार दुरुस्तीची गरज कमी भासते. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या निर्माण होत नसल्याने अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांना दीर्घकालीन दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील रस्ते जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आभार मानले आहेत.








