डुबकी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वारंवार तक्रारी, फोटो व फोन करूनही पालिकेचे दुर्लक्ष; तातडीने कचरा हटविण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

अमळनेर : शहरातील सुमारे १०० वर्षे जुन्या डुबकी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर कचरा साचून डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मंदिराकडे ये-जा करणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपालिकेने तातडीने हा कचरा उचलून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डुबकी मारुती मंदिर हे शहरातील जुने व श्रद्धास्थान असलेले मंदिर असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या मार्गालगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात नगरपालिकेच्या मुकादमांना फोनद्वारे वारंवार माहिती देण्यात आली होती. तसेच नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक साहेब यांनाही कचऱ्याचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवून परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. मात्र, वारंवार सूचना करूनही अद्याप कचरा हटविण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
फोन करून माहिती, प्रत्यक्ष निवेदन आणि फोटोद्वारे परिस्थिती निदर्शनास आणून देऊनही जर कचरा उचलला जात नसेल, तर नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नाल्यालगत सातत्याने कचरा टाकला जात असल्याने भविष्यात हा परिसर आणखी अस्वच्छ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी आणि या ठिकाणी पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आमच्या मागणीकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल,” असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर ललित यशवंत सातपुते (समाजसेवक), दीपकचंद बन्सीलाल अग्रवाल (अध्यक्ष, डुबकी मारुती मंदिर), माळी जगन्नाथ, धनराज चौधरी, कलेपश पाटील, विजू न्हावी, सचिन शिंदे, राहुल वाडीले, दीपक पाटील आणि समाधान पाटील यांच्या स्वाक्षऱ्या/सह्या आहेत.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें