
अमळनेर : श्री सद्गुरु संत सखाराम महाराज यात्रा सोहळ्यानिमित्त तालुक्यासह जिल्हा व बाहेरगावातून हजारो भाविक अमळनेरात दाखल होत आहेत. भक्तिमय वातावरणात यात्रा उत्साहात सुरू असताना दुसरीकडे संत सखाराम महाराज वाडी परिसरात मात्र घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.
नदीकाठील वाडी परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, श्री शिव स्वामी किराणा दुकानात समोरच कचऱ्याचा मोठा डेपो साचलेला असून त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एकीकडे नगरपालिकेकडून “स्वच्छता अभियान” चे गाजावाजा केले जातात, तर दुसरीकडे यात्रेच्या मुख्य मार्गावरच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहाची देखील खूप दुर्गंधी येत आहे त्यामुळे प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. धार्मिक स्थळ परिसरात अशी अस्वच्छता असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे काही सामाजिक संस्था व संघटना स्वच्छता अभियानाच्या नावाखाली केवळ फोटोसेशन व प्रसिद्धीपुरते उपक्रम राबवत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. प्रत्यक्षात जिथे गरज आहे, तिथे कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. यात्रेला येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळणे ही प्रशासनासह सामाजिक संस्थांचीही जबाबदारी आहे.
नगरपालिकेने तात्काळ कचरा हटवून परिसराची स्वच्छता करावी, नियमित फवारणी व निर्जंतुकीकरण करावे, अन्यथा यात्रेच्या काळात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“संतांच्या नगरीत भक्तांना दुर्गंधीची भेट देणार का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.








