अपघातप्रवण परिसरातील नागरिकांना दिलासा; महिलांच्या पाठपुराव्यामुळे कामास तात्काळ सुरुवात
अमळनेर | अटकाव न्यूजदाजीबा नगर व गळवाडे रोड परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आज (दि. 26 मार्च 2026) स्पीड ब्रेकरच्या कामास सुरुवात करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम आमदारांकडून स्वखर्चातून करण्यात येत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. दिनांक 15 मार्च 2026 रोजी याच परिसरात एका महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर स्थानिक महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र कामाला विलंब होत असल्याने महिलांनी थेट आमदारांकडे धाव घेतली. महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार अनिल पाटील यांनी आठ दिवसांत स्पीड ब्रेकर उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आर. बी. कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदारांच्या तत्परतेचे कौतुक केले. काम सुरू असताना काही राजकीय कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी स्थानिक महिलांनी सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करू नये तसेच विनाकारण श्रेय घेऊ नये, अशी ठाम भूमिका मांडली. काही काळ शाब्दिक चकमक झाली; मात्र परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी संबंधितांनी माघार घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत महिलांनी दाखविलेली एकजूट आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी सौ. नूतन पाटील, आशा नामदेव पाटील, निर्मला अरविंद पाटील, संगीता कापडणे, सुरेखा पाटील, सरला पाटील, नेहा परदेशी, तृप्ती डहाके, वैशाली पाटील, योजना पाटील, ज्योती पवार, रेखा चंद्रकांत पाटील, रेखा भागवत, मानसी पाटील, बबिता झिमबल, पुरुषोत्तम पाटील, अशोक पाटील, सुमेरसिंह पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाययोजना, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था उभारण्याची मागणीही केली आहे.