
अमळनेर:-अटकाव न्यूज-
कळमसरे–शहापूर मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व फरशी पुलांच्या कामाला सुरुवात झाली असली तरी सुरक्षा उपाययोजनांचा गंभीर अभाव दिसून येत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम सुरू असूनही संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही सूचना फलक किंवा इशारे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मातीमिश्रित बारीक खडी टाकून दाबण्याचे काम सुरू असून, कळमसरे–शहापूर दरम्यानच्या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात जवळपास दहा लहान फरशी पुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले आहे.
ठेकेदाराने बाजूने पर्यायी मार्ग तयार केला असला, तरी त्या मार्गाबाबत कोणतीही स्पष्ट चिन्हे नसल्याने रात्री वाहनचालकांना रस्त्याची दिशा समजणे कठीण होत आहे. अचानक येणाऱ्या खोलगट भागामुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.
वाहनचालकांचे म्हणणे आहे की, काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक, प्रतिबंधक फिती, परावर्तित चिन्हे आणि रात्री दिसतील अशी लाईट्स लावणे आवश्यक असताना ठेकेदाराकडून निष्काळजीपणा होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
कामाच्या गुणवत्तेबाबतही शंका
हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. माजी मंत्री अनिल पाटील यांनी मागील पंचवार्षिक काळात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर कामाला गती मिळाली. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
कळमसरे व शहापूर येथील ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कामात निकृष्ट दर्जाचा वापर आढळल्यास रस्त्याचे काम थांबवण्यात येईल. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी जोर धरत आहे.








