मारवड महाविद्यालयात ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा

मारवड महाविद्यालयात ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा.

मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 जानेवारी रोजी ” राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मुर्ती व मार्गदर्शक म्हणून नवनियुक्त विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे नवनियुक्त सदस्य प्रा. डॉ. विजय तुंटे हे होते. तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. त्यानंतर नवनियुक्त सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे नवनियुक्त सदस्य प्रा. डॉ. विजय तुंटे यांचा निवडीबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. तद्नंतर उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते ” मतदार दिनाची ” शपथ दिली गेली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी आपल्या मनोगतात सत्कार बद्दल आभार व्यक्त करून भारतातील राजकीय मतदान पद्धती, भारतातील लोकशाही ही प्रगल्भ व अनुभवी राजकीय नेतृत्वाच्या हाती असल्याने भारत, असंख्य अडचणींवर मात करीत सदैव प्रगती पथावर आहे असे नमूद केले.

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी सत्काराला उत्तर देतांना, भारतीय राज्यघटनेतील मतदारांचा हक्क याबाबत सविस्तर विवेचन करून नव मतदारांपुढील आव्हाने व लोकशाही पद्धतीत राजकीय नेतृत्व निवडताना घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी, स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील राजकीय निवडणूक पद्धतीची जडणघडण व भारतीय लोकशाही यावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने, तर आभार प्रदर्शन प्रा डॉ दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.