अमळनेर- (योगेश पाने) – सध्या तालुक्यातील थंडी शेतकऱ्यांच्या चांगलीच जीवावर उठली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षी अधिक प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यामुळे झालेले खरीप हंगामाचे नुकसान यातून बळीराजा वर येत नाही, तोच थंडीमुळे तुरीवर आलेल्या रोगाने ती जळाली आहे, पिकाला बसणाऱ्या वातावरणाच्या फटक्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गहू अती थंडीमुळे परिपक्व होण्याआधीच ओंबी निघत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. अज्ञात रोगामुळे तूरही उभी वळून गेली. त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढण्याऐवजी कमी होणार आहे. निसर्गाच्या दृष्ट चक्रात अडकलेला शेतकरी पिकाच्या चिंतेत बुडाला आहे. थंडीमुळे तूर व गव्हाची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची चिंता भेडसावत आहे. रब्बीच्या हंगामात तरी चार पैसे पदरी पडतील, या आशेवरही पाणी फिरताना दिसत आहे.
काळ्या मातीत घाम गाळून उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे निराशाच येत आहे. त्यामुळे कुटुंबाचा डोलारा कसा हाकायचा असा, प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. थंडीमुळे हरभरा, तुर व गव्हाची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची चिंता भेडसावत आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हतबल झालेत. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.