अमळनेर: आपला विधानसभा मतदारसंघ कोणत्या दिशेने न्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे, 60 वर्षात झाली नाही एवढी कामे गेल्या दीड वर्षात मंत्री अनिल पाटलांच्या माध्यमातून झाली आहेत, पाच वर्षांआधीचा काळ आठवा काय स्थिती होती, आताही येणारी उद्याची पिढी कसा श्वास घेणार याचा विचार आपल्याला करायचा असल्याचे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी श्रीमती वाघ पत्रकार व कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या.
आपल्या मतदार संघात जाती-जातीचे राजकारण सुरू असून जाति-जातीत घाला घातला जात आहे. मलाही धमक्या येत आहेत. मात्र आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही, हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या द्या माझ्यापुढे हजार कार्यकर्ते उभे राहतील अशा कडक शब्दात स्मिता वाघ यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
गत काळातील घटना अथवा वक्तव्य व्हायरल करून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत. बोलायला संस्कृती, मर्यादा असली पाहिजे पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती आता नकोय, पूर्वी हातगाड्यांवर दारू मिळायची यात ६० तरुणांचा बळी गेलाय. रोजगारासाठी औद्योगिक दृष्ट्या मोठी एमआयडीसी असावी आणि त्यासाठी लागणारे पाणी पाडळसरे धरणातून उपलब्ध होईल यासाठी मी व अनिल दादा कटिबद्ध राहू असा वादाही वाघ यांनी केला. नर्मदा रीसॉर्ट येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला.
नको भेद आपल्या जातीचा विकास करूया आपल्या मातीचा- मंत्री अनिल पाटील
नको भेद आपल्या जातीचा विकास करूया आपल्या मातीचा हे ब्रीदवाक्य सांगत मंत्री अनिल पाटील
म्हणाले की तरुण वर्गाला वेगळ्या मार्गाने नेण्यासाठी फोन पे च्या माध्यमातून पैसे टाकून दारू प्या आणि गोंधळ घाला अशी शिकवण दिली जात आहे,पण अशी संस्कृती अमळनेरची नाही. आमचा भूमिपुत्र हाच आमचा जातीधर्म असं तालुक्याने दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. जनतेला शहराची उत्तुंग भरारी गेली पाच वर्षे अनुभवायला मिळाली, दर्जेदर रस्ते, पायाभूत सुविधा, शेतीसिंचन व समाजिक विकासाचा वादा आम्ही पुर्ण केला आहे. ना.अजितदादा पवार, ना देवेंद्र फडणवीस व ना एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मंत्री पदाची संधी दिली, त्याचे सोने झाले,, ज्यादिवसापुन मी आमदार झालो तेव्हापासूनच धरणाला प्राधान्य देऊन चौथी सुप्रमा मिळवली आहे, सुप्रमा नंतर अनेक मान्यता महत्वाच्या असतात त्या मिळाल्या असून पीआयबी ची मान्यता ही मिळाली असून लवकरच पी एम के एस वाय मध्ये समावेश होईल.ग्रामीण भागातील रस्स्त्यांचे जाळे,शहर व ग्रामीण भागात होत असलेली कामे बघता अमळनेर तालुका एक दिवस जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही याचं दृष्टीने आपला विकास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विकास कामात नवीन प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक बस स्टँड, महाराणा प्रताप चौकात होणारी पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी, शहराचे रस्ते, 70 कोटीतून होणारे डीपी रस्ते होत,197 कोटीची पाणीपुरवठा योजना, शेतात पाणी देणारी 110 कोटींची योजना, बोरी व पांझरा येथे टाकले गेलेले बंधारे यांचा उल्लेख करत सरकारी एमआयडीसी आणण्यासह संग्रहालय आणि सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक मंजुरी येत्या काळात मिळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाखालची वाळू घसरल्यावर दारू पाजून गोंधळ घालण्याचे प्रकार घडविले जातात, मात्र आम्ही कच्चे नाहीत अजमवायचे असेल तर एका गावात ही घुसू देणार नाही, नगरपालिकेची पुनरावृत्ती होण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा ही त्यांनी दिला.
तसेच पत्रकाराशी संवाद साधताना दुष्काळ कसा जाहीर होतो हे विरोधकांना माहीत नाही. मी पीक विमा, अनुदान, मागील बाकी असे सुमारे साडेसहाशे कोटी रुपये अमळनेर तालुक्याला मिळवून दिले. भूजल पातळी वाढली आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न क्षमता वाढली तर पीक विमा जास्त मिळतो यात शेतकऱ्यांचा फायदा आहे असा खुलासा त्यांनी केला. माजी आमदार साहेबराव पाटलांचा आपण गेम केला असा आरोप आपल्यावर होत आहे या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील म्हणाले की साहेबराव पाटील हुशार माणूस आहे. त्यांचा कोणी गेम करू शकेल असा कोणी नाही. उलट ते निवडणुकीत कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही. माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजप चे सदस्यच राहिले नाहीत. भाजप शी त्यांचा काहीच संबंध राहिलेला नाही असेही स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी केले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा जाहिरनामा अजित पवार यांनी ऑनलाईन जाहीर केल्यावर त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या स्थानिक पातळीवर जाहिरनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. अमळनेर मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना व्यासपीठावर मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि.प सदस्या जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, ऍड व्ही आर पाटील, शीतल देशमुख, राकेश पाटील, उमेश वाल्हे, संदीप पाटील, भिकेश पाटील, महेंद्र बोरसे, प्रा सुरेश पाटील, प्रा मंदाकिनी भामरे, आशा चावरीया यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.