मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष

अमळनेर: आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्री मंगळग्रह देवाचा अभिषेक करून तेथूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल भाईदास पाटलांनी महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज काल सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.
यावेळी श्री मंगळग्रह मंदिरापासून हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत निघालेल्या महा रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले होते.तत्पूर्वी काल सकाळी मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या निवासस्थानी मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती सौ जयश्री पाटील व वहिनी श्रीमती राजश्री पाटील व नातेवाईक यांनी औक्षण केले.यावेळी उपस्थित असलेल्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांचेही अनिल पाटलांनी आशिर्वाद घेतले.अमळनेर भाजपाचे निवडणूक प्रभारी गुजरात येथील मुकेशभाई आंगडीया यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्यात.त्यानंतर श्री मंगळग्रह मंदिरावर पोहोचल्यावर सुरवातीला मंगळ देवाचा अभिषेक व आशीर्वाद घेऊन महा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सजावट केलेल्या रथावर मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व महायुती चे पदाधिकारी तसेच विविध समाजाचे मान्यवर आणि विविध समाजाच्या महिला भगिनी विराजमान झाल्या होत्या. उपस्थित महा जनसागराच्या संगतीने वाजतगाजत महा रॅलीस प्रारंभ झाला.यावेळी कार्यकर्त्यांनी डी जे च्या तालावर जोरदार ठेका धरला होता. अनेकांच्या हातात अनिल पाटील व स्मिता वाघ यांच्या सह महायुतीचे राज्याचे व जिल्ह्यातील नेत्याचे पोस्टर्स होते. तर अनिल पाटील व स्मिता वाघ रथा वरून जनतेस अभिवादन करीत होते. जोरदार घोषणाबाजी करीत ही रॅली मार्गस्थ झाली, वाटेत विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यास अनिल पाटील यांनी माल्यार्पण केले तर ठीकठिकाणी विविध समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करून शुभेच्छा दिल्या. व्यापारी बांधव, व्यावसायिक बंधु आणि अनेक मित्र मंडळांनी देखील स्वागत केले.
पैलाड,दगडी दरवाजा, बस स्टँड मार्गे रॅली प्रांत कचेरीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर रॅली आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल पाटलांना खांद्यावर घेत निवडणूक कार्यालयात नेले.कार्यालयात केवळ पाच जण अपेक्षित असल्याने खासदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्ष नरेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान सदर रॅलीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी जि.प व पं.स सदस्य, मार्केट चे आजी माजी पदाधिकारी, ग्रामिण भागातील सरपंच व ग्रा पं पदाधिकारी, सोसायटी चेअरमन व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक, ग्रामिण व शहर भागातील शेतकरी, व्यापारी बांधव, युवक वर्ग आणि महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *