अमळनेरात तुतारी कोण फुंकणार ? काय आहे संभाव्य उमेदवारांची परिस्थिती ?

तिलोत्तमा पाटील यांना अन्य इच्छुक उमेदवारांचा पाठिंबा मिळाल्याने वरिष्ठांच्या हालचालींना वेगळे वळण….. एकनिष्ठतेच्या बळावर उमेदवारी घोषित होण्याची दाट शक्यता

तिलोत्तमा पाटील यांना  मिळालेल्या अन्य इच्छुक उमेदवारांच्या पाठिंब्यामुळे चित्र पालटणार ?

◼️तालुका अध्यक्षांच्या पुढाकाराने १ इच्छुक माजी आमदार ज्यांनी स्वतः युवा इच्छुक उमेदवार श्याम पाटलांना पाठिंबा दिला आहे.
◼️ ५ इच्छुक व अन्य ४ पदाधिकारी असे एकूण ९ पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेल्या एकनिष्ठ तिलोत्तमा पाटील.
◼️ काँग्रेस एकनिष्ठ असे तुतारी कडे उमेदवारी अर्ज दाखल करत सांगणारे डॉ. अनिल शिंदे.
◼️ प्रशांत निकम

अमळनेर: तुतारी फुंकण्यासाठी मुंबईत गेल्या २ दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. स्पर्धेत असलेले इच्छुक उमेदवार नेतेमंडळीं समोर गिरट्या घालून आपल्या उमेदवारी संदर्भात भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रभर शरद पवार साहेब व तुतारीचे जोरदार वातावरण असताना केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या नावाने अमळनेर विधानसभा क्षेत्रात कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो या अपेक्षेने अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी करत आपल्या उमेदवारीची मागणी केली होती. गावागावात खेडोपाडी शरद पवार साहेबांचाच माणूस निवडून येणार असे प्रचंड सकारात्मक वातावरण असताना विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक अर्ज प्रक्रिया भरण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक गोष्टींना रंगत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे खूप उशिराने माजी आमदारांमार्फत तुतारीकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्रित बसण्यासाठी अनेक वेळा त्यांच्या मार्फत गळ घालण्याचा प्रयत्न झाला परंतु स्वाभिमान, एकनिष्ठतेचे दाखले देत अन्य इच्छुक उमेदवारांनी त्यांस कधीही दुजोरा न देता एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चाणक्य नीति चा वापर करत माजी आमदारांमार्फत आधी प्रशांत निकम नंतर श्याम पाटील यांना पाठिंबा देत त्यांच्यात फूट इतरांना डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यात कुठलीही फूट न पडता अन्य इच्छुक उमेदवारांनी लागलीच महिला व प्रामाणिक एकनिष्ठ चेहरा म्हणून तिलोत्तमा पाटील यांच्या नावासाठी पुढाकार घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. आणि आम्ही एकसंघ आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यामाध्यमातून झाल्याचे बोलले जात आहे.

विशेष लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे श्याम पाटील, साहेबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे यांच्या समर्थकां मार्फत अनेक वेळा आमची उमेदवारी निश्चित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु तिलोत्तमा पाटील यांनी कुठलाही गाजावाजा न करता सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या नावाखाली आपल्या जिल्हा परिषद गटाचा पहिला मेळावा हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत यशस्वीपणे घेऊन दाखवलाच शिवाय अन्य इच्छुक उमेदवारांची मर्जी जिंकत समर्थन मिळवण्यात देखील त्या यशस्वी झाल्या.

या सर्व घडामोडी तिलोत्तमा पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत असे गृहीत धरूनच कदाचित अमळनेर विधानसभेत नेमकी तुतारी कोण फुंकणार हे अद्याप जाहीर न करता गुलदस्त्यातच ठेवले आहे.

हे सर्व घडत असताना माजी आमदारांनी आपण या स्पर्धेतून बाहेर पडत आहोत असे सांगून युवा चेहरा म्हणून श्याम पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतरही स्वतःच्या उमेदवारीसाठी आग्रही राहण्याची भूमिका त्यांनी दाखवली आहे.

उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ अनुभवी व एकनिष्ठ चेहरा म्हणून तिलोत्तमा पाटील यांचे नाव प्रकर्षाने समोर येते.त्यांचा वरिष्ठ पातळीवर देखील मोठा दबदबा असून उत्तर महाराष्ट्रात महिला नेतृत्वास उमेदवारीची संधी देण्याचा पक्षाने विचार केल्यास तिलोत्तमा पाटील यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. शिवाय आता त्यांच्या पारड्यात इतर इच्छुक उमेदवारांचे समर्थनाचे पत्र पडल्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाल्याचे समजते. आदरणीय शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त एकनिष्ठ लोकांना संधी मिळणार हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले असल्याने हे समर्थनाचे पत्र वरिष्ठांच्या हाती लागताच आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल अशी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये चर्चा ऐकिवात येत होती.

लवकरच हा तिढा मिटून एक सक्षम पर्याय तुतारी कडून दिला जाईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *