अमळनेर तालुक्याला लागला बलात्काराचा डाग
अमळनेर : संतांची भूमी, प्रतिपंढरपूर अशा अनेक उपाधी अमळनेरला आहेत, तर अमळनेर म्हणजे कुठलाही डाग नसलेले म्हणजे निर्मळ असलेले असे अमळनेर… असाही अर्थ काही लोकं अमळनेरचा सांगत असतात. मात्र बुधवारी अमळनेर सारख्या निर्मळ तालुक्यालाही बलात्काराचा डाग लावल्याची दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे घडली आहे. जवखेडा गावात 12 वर्षीय मूकबधिर असलेल्या चिमुरडीवर 65 वर्षीय (वय जास्त असू शकते) व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली असल्याने यामुळे संपूर्ण तालुक्याची मान शरमेची खाली जाईल अशी ही घटना आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, 12 वर्षीय अल्पवयीन चिमुरडी ही तिच्या आजी – आजोबांसोबत जवखेडा येथे राहते, आई आपल्या मुला-बाळांचे पोट भरावे म्हणून गुजरात मधील अहमदाबाद येथे मजुरी करीत असते, पिढीतेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन तिला त्याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या मोरीत नेले व तेथे तिच्यावर बलात्कार करीत असल्याचे तिचा नातेवाईक मुलाने तिच्या आई व इतर नातलगांना सांगितले. हे सर्व पाहिल्यावर “बाबा तुम्ही हे काय करताय ?” अशी विचारणा केल्यावर निर्लज्ज पणे सदर इसमाने माफी मागून तेथून काढता पाय घेतला. हे सर्व माहीत झाल्यावर तिची आई अहमदाबाद येथून घरी जवखेडा येथे आली व काल बुधवारी या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 64 (2) (1) ,64 (2) (k), 65 (1), पोस्को कायद्याचे कलम 3(अ), 3(क), 4, (5) (के), 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.