मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अतिरीक्त कामामुळे अंगणवाडी केंद्राचे मूळ काम दुर्लक्षित…

बालकांचे आणि गरोदर व स्तानदा मातांचे कुपोषण वाढण्याची शक्यता…

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

अमळनेर: शासनाने राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. सदर योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर लादली जात आहे.
अंगणवाडी सेविका ह्या कुपोषण निर्मूलन, पुरक पोषण आहार वाटप,गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी, लसीकरण,किशोरी मुलींना आरोग्य बाबत मार्गदर्शन करणे आदी महत्वाची कामे करत असतात असे असताना शासनाने त्यांना लाडकी बहिण योजनचे अर्ज भरण्याचे अतिरीक्त काम देऊन त्यांचा कामाचा ताण वाढवला आहे.
लाडकी बहिण योजनेच्या अर्ज ऑनलाइन भरताना वारंवार अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत त्यात कमी शिक्षण असणे, नारी शक्ती दुत ॲप ओपन न होणे,सर्व्हर डाऊन होणे,मोबाईल फोन रेंज नसणे,अर्ज सबमिट न होणे, त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत.
अंगणवाडी केंद्राचे मूळ काम करून लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात आणि सेविकांच्या घरीही महीला गर्दी व गोंधळ करीत असल्याने घरची कामे ही होत नसून जेवयालाही वेळ मिळत नाही.त्यामुळे सेविकांना कौटुंबिक आणि मानसीक त्रास सहन करावा लागत असल्याने अंगणवाडी ताईंचा संताप वाढत आहे.
अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेचे अतिरीक्त काम दिल्यामुळे पूर्ण दिवस मूळ कामासाठी त्यांना वेळच मिळत नाही त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या दैंनदिन कामामध्ये अडथळे येत असून पावसाळा सुरू असल्याने बालकांचे कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सदरचे काम अंगणवाडी सेविकांकडून काढून घेण्यात यावे.अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.
एकीकडे शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन देते. त्यांचे मानधन वाढीसह अनेक मागण्या प्रलंबित असून त्यांच्यावर निर्णय घ्यायला शासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही. त्यासाठी महीला कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावी लागतात.
महागाई आकाशाला भिडली आहे तरीही शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याबाबतचा निर्णय घेत नाहीये.मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूईटी दिली जात नाही. दरमहा पेन्शनचा प्रलंबित आहे.असे असताना इतक्या कमी मानधनात काम करूनही दिवसेंदिवस त्यांच्यावर कामाचा बोजा टाकला जात आहे.
अंगणवाडी सेविकांना मूळ कामाव्यतिरिक्त अन्य कामे सोपवू नयेत.अन्यथा त्यांच्यासमोर आंदोलने करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे दिलेले अतिरीक्त काम काढून त्यांचे मूळ काम करू द्यावे. नाहि तर अंगणवाडी कर्मचारी राज्यभर तीव्र आंदोलन करतील. असा इशाराही रामकृष्ण बी. पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]