सकस,दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी अभ्यास आवश्यक – प्रा.विसुभाऊ बापट

अमळनेरात कालिदास दिन व कवीसंमेलन संपन्न

अमळनेर : सकस साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळते. सकस व दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी साहित्यीकाने सातत्याने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन साहित्याचे अभ्यासक प्रा.विसुभाऊ बापट यांनी केले. महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित व्याख्यान व कविसंमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
अमळनेर येथील लोकमान्य टिळक स्मारक समिती व अखिल भारतीय साहित्य परिषद संलग्न साहित्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंगलाल अग्रवाल,प्रा.डॉ.
प्र.ज.जोशी,प्रा.एन.के.कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना प्रा.बापट म्हणाले की, मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी इतके साहित्य प्रकार अन्य भाषांमध्ये नाही. आपल्या भाषेची ही समृद्धी आपण जपली पाहिजे. पण अन्य आवश्यक त्या भाषेचा अभ्यास व सन्मानही आपण करावा. सकस व दर्जेदार साहित्य निर्मिती झाली पाहिजे व त्यासाठी सर्वसमावेशक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. नवोदित लेखक,कवींनी यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा प्रा.विसुभाऊ बापट यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा.बापट यांच्या अमळनेर येथे यापूर्वी सादर झालेल्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाची श्रोत्यांनी आठवण काढली. आपल्या मनोगतात त्यांनी काही मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या.

कवी कालिदास प्रतिभावान साहित्यीक – प्रा.प्र.ज.जोशी
महाकवी कालिदास यांनी त्यांच्या साहित्यात संस्कृती,निसर्ग,मानवी भावभावना,नातेसंबंध यांचे वर्णन केले आहे. कालिदासाच्या साहित्यातील वर्णन आणि प्रत्यक्षात त्या परिसरातील निसर्ग हे तंतोतंत जुळणारे आहे.यावरून त्यांची अभ्यासू वृत्ती,
निरीक्षणशक्ती याचे दर्शन वाचकांना होते. वाचकांना भुरळ पडावी असे साहित्य कालिदासाचे आहे. वाचकांनी या साहित्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रमुख वक्ते प्रा.डॉ.प्र.ज.जोशी यांनी केले.

सांस्कृतिक,साहित्यीक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन – बजरंगलाल अग्रवाल
समाजाच्या जडणघडणीसाठी सामाजिक,सांस्कृतिक व साहित्यीक कार्यक्रम,उपक्रमांचे आयोजन काळाची गरज आहे. लो.टिळक स्मारक समिती या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देईल असे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंगेश काळकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.एन.के.कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नरेंद्र सोनवणे,दिनेश नाईक,विवेक जोशीं,
जे.डी.निकुंभ,दिपक खोंडे,अभिषेक पाटील,सारंग गर्गे आदींनी परिश्रम घेतले.

रंगतदार कवी संमेलन

कविसंमेलनाचा प्रारंभ राष्ट्रीय किर्तनकार व कवी योगेश्वर उपासनी यांनी कवी कालिदास यांच्यावरील कवीता सादर करून केला. यात प्रा.सागर सैंदाणे,शैलेश काळकर,प्रकाश पाटील,करूणा सोनार,रेखा मराठे,समिता भामरे,रविंद्र सुखदेव पाटील,शितल अहिरराव,पूनम भामरे,सुनिता पाटील,नुतन हिंमतराव पाटील, उज्वला शिरोडे,हेमलता भामरे,खुशाल नितीन उपासनी या कवींनी सहभाग घेतला.सुत्रसंचालन रेखा मराठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]