अमळनेर विधानसभेसाठी ‘पोटल्या’ उघडू लागल्या

अवघ्या तीन- साडेतीन महिन्यावर विधानसभेची निवडणूक

अमळनेर,( प्रतिनिधी )अटकाव न्यूज:  अवघ्या तीन- साडेतीन महिन्यावर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. लोकसभेत महाराष्ट्रात भाजप व महायुतीला अपयश आले असले तरी जळगाव जिल्हयात मात्र भाजप ने बाजी मारली आहे.
अमळनेर विधानसभेत यंदा किमान पाच तगडे उमेदवार राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने विधानसभेच्या पोटल्या आता उघडू लागल्या असून विविध उमेदवार आपले डावपेच टाकू लागले आहेत.
विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी दृष्टीक्षेपात पडणाऱ्या विकास कामांवर लक्ष वेधले असून अमळनेरचे रूप पालटून त्या कामाच्या आधारावर जनतेसमोर जातील. महसूल इमारत ,प्रशासकीय इमारतीचे सुरू असलेले बांधकाम , शहराबाहेरून जाणारे डी पी रोड वेगाने होत आहेत , पंचायत समिती इमारतीचे काम सुरू होण्याच्या मार्गावर , बस आगार , पाडळसरे धरणाचे वॉक वे ब्रिज पर्यंतचे काम , तालुका क्रीडा संकुल यासह कोट्यवधी रुपयांची इतर अनेक कामांचा प्रकाशझोत मतदारांपुढे मांडले जातील.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील गेल्यावेळी केलेली घोषणा ‘शेतीला पाणी आणि हाताला काम’ हे अमलात आणण्यासाठी सुतगिरणीच्या स्पिनिंग मिलच्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर काढले आहे. सुतगिरणीच्या माध्यमातून सुरुवातीला १२००ते १५०० बेरोजगारांना काम मिळू शकेल याच्यावर फोकस केले जाईल. तसेच त्यांनी त्यांच्या काळात केलेली उड्डाण पूल , जलयुक्त शिवार कामे यावर प्रकाशझोत टाकून मतदारांना पुन्हा आपलेसे करण्याकडे कल असेल.
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून व समर्थकांकडून देखील त्यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे साठी केलेला प्रयत्न आणि पाणी साठा यावर जोर दिला जाईल. तसेच प्रताप कॉलेज उड्डाण पूल , बंधारे , रस्ते , तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारी विशेष कामे , पुष्पलता ताई नगराध्यक्ष असताना केलेली लक्षवेधी विकास कामे यावर मतदारांचे लक्ष वेधून पुन्हा एकदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न असतील.
नुकतेच सुरत हुन आलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई पाटील यांनी देखील सुरुवातीला हेडावे रस्त्याला लहान उद्योग सुरू करून १५० – २०० बेरोजगारांना रोजगारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थी व त्यांच्या माध्यमातून पालकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे दाखले एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे यांनी देखील आपले प्रयत्न सुरू केले असून सामाजिक कार्यक्रमाची एकही संधी ते सोडत नाहीत. वैद्यकीय सेवा , यापूर्वी पराभूत झाल्याने सहानुभूती , प्रा सुभाष पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांसाठी लढा ,पीक विमा व इतर मुद्द्यांवर जोर देऊन काँग्रेसच्या वाढत्या प्रभावाचा उपयोग करून ते जनतेसमोर जातील.
काँग्रेसचे संदीप घोरपडे यांनी संपर्क कार्यालयाचा शुभारंभ केला असून त्यांच्या समर्थकानी प्रचार सुरू केला आहे. घोरपडे यांनी भ्रष्ट व्यवहाराच्या मतदान विकत घेण्याच्या विरोधात जनजागृती सुरू केली आहे. त्या मुद्द्यावर ते प्रचाराला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी देखील उमेदवारांच्या गर्दीत आपलीही विधानसभा लढण्याची तयारी दर्शवली आहे. आंदोलने ,लढा ,शेतकरी व सामान्य नागरिकांच्यासाठी शासन आणि प्रस्थापितांच्या विरोधात दिलेल्या लढ्याच्या मुद्द्यावर आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता ते निवडणुकीच्या मैदानात उतरतील.
याव्यतिरिक्त राज्यातील विविध घडामोडी ,महायुती ,महाविकास आघाडी , स्वतंत्र लढतात की एकत्र लढतात तसेच उमेदवारांचा पक्ष बदल यावर बरेच राजकारण अवलंबून राहील.

जेष्ठ पत्रकार संजय पाटील,पत्रकार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]