अमळनेर: अटकाव न्युज – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) ही महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, आणि सेवा पुरविणाऱ्या सर्व संघटना व संस्थांची शिखर संस्था आहे. यंदाच्या महाराष्ट्र चेंबरच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातून वेदांशू पाटील यांची उत्तर महाराष्ट्रासाठी गव्हर्निंग कौन्सिल पदी बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र चेंबर हे शासन दरबारी उद्योजकांच्या विविध समस्या मांडणे, प्रश्न सोडविणे, उद्योजकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी विविध संकल्पना राबविणे, महाराष्ट्रात नवनवीन उद्योग निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे, तसेच राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील उद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी मदत करणे यासाठी कार्यरत आहे. आयात-निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी योग्य दिशा दाखवणे आणि शासन दरबारात त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कामकाजात सक्रिय सहभाग घेणे या सर्व बाबतीत महाराष्ट्र चेंबर गेल्या ९७ वर्षांपासून सक्रिय आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि शिखर संस्था आहे.
यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र चेंबरचे विद्यमान अध्यक्ष श्री. ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री. संजय सोनवणे, नाशिक शाखा चेअरमन पदी श्री. अंजू सिंगल आणि को-चेअरमन पदी श्री. भावेश माणिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. उत्तर महाराष्ट्र २ मधून जळगावच्या संगीता पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
वेदांशू पाटील यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्वात कमी वयाच्या सदस्याचा मान मिळाला आहे. तसेच, अमळनेर मधून महाराष्ट्र चेंबरवर प्रतिनिधित्व करणारे ते पहिले उद्योजक ठरले आहेत, वेदांशू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील यांचे सुपुत्र आहेत. अमळनेरकरांसाठी ही अतिशय कौतुकाची व अभिमानास्पद बाब आहे.
वेदांशू पाटील यांचे मार्गदर्शक श्री. संतोश मंडलेचा जे MACCIA चे माजी अध्यक्ष आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही मोठी कामगिरी केली आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे योगदान व्यापार आणि व्यवसायाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही संस्था उद्योग आणि व्यापाराच्या समस्यांचे निराकरण करते आणि उद्योजकांना शासन दरबारी सहाय्य प्रदान करते.